नागपुरात पाणीपुरीचे ठेले बनताहेत ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:26 AM2020-09-20T01:26:54+5:302020-09-20T01:27:59+5:30

रस्त्यावरील खाद्यपदार्थ व पाणीपुरीच्या दुकानात सुरक्षेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा ठेल्यांवर स्वच्छता आणि शारीरिक अंतराचे नियमही धाब्यावर बसलेले असतात. त्यात चौकाचौकातील पाणीपुरीचे ठेले ‘कोरोना’चे वाहक ठरू पाहात आहेत.

Panipuri cart becoming Corona hotspots in Nagpur | नागपुरात पाणीपुरीचे ठेले बनताहेत ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

नागपुरात पाणीपुरीचे ठेले बनताहेत ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

Next
ठळक मुद्दे नियम धाब्यावर : व्यवसाय करा पण स्वच्छतेकडे तरी लक्ष द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही आठवड्यात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असल्याने प्रत्येकाच्या मनात धडकी भरली आहे. काही साहित्य, भाज्या खरेदी करण्यास गेल्यावर मनात संशयाचे ढग जमा होतात. अशा अवस्थेत किराणा व्यावसायिक व इतर साहित्य विक्रेते सुरक्षेची काळजी घेताना दिसतात. मात्र रस्त्यावरील खाद्यपदार्थ व पाणीपुरीच्या दुकानात सुरक्षेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा ठेल्यांवर स्वच्छता आणि शारीरिक अंतराचे नियमही धाब्यावर बसलेले असतात. त्यात चौकाचौकातील पाणीपुरीचे ठेले ‘कोरोना’चे वाहक ठरू पाहात आहेत.
एकीकडे सर्व व्यवहार सुरू करण्याकडे पावले उचलली जात आहेत तर दुसरीकडे कोविड रुग्णांची वाढही झपाट्याने होत आहे. अशावेळी आपणच आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अगत्याचे आहे. मात्र पाणीपुरीच्या ठेल्यांवर या सुरक्षेचे सर्रास उल्लंघन होत आहे. रोजगाराचा प्रश्न म्हणून विक्रेत्यांना दुकाने लावू दिली आहेत पण नियमांकडेच दुर्लक्ष होत आहे. रामदासपेठ, गांधीनगर, प्रतापनगर, आयटी पार्क, सीताबर्डी, सदर, गांधीबाग, महाल किंवा दक्षिण नागपूरमध्ये मानेवाडा रोडच्या वस्त्यांमध्ये अशा सर्वच भागात पाणीपुरीचे ठेले लागलेले आपल्याला दिसतील. मात्र या ठेल्यांवर दिसणारे दृश्य चिंताजनकच म्हणावे लागेल. एकतर या ठेल्यांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला असतो. गर्दीमध्ये कुणीही याबाबत काळजी घेताना दिसत नाही. स्वच्छतेचेही नियम पाळताना दिसत नाही.

एकच प्लेट अनेकांना
विक्रेते प्लेटमध्ये पाणी देऊन गुपचूप खायला देतात आणि हीच प्लेट इतरांनाही पास केली जाते. एकाच प्लेटमध्ये वारंवार गुपचूप खाणे सुरू असते. दुकानदारही एकाच कपड्याने प्लेट पुसून दुसऱ्या ग्राहकाला देतो. अंतराचे पालन नाही, तोंडावर मास्क नाही आणि स्वच्छतेचाही आग्रह होत नाही. पाणीपुरी विक्रेतेसुद्धा ग्राहकांना नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरत नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे एकमेकांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे पाणीपुरी विक्रेते कोरोनाचे वाहक ठरणार नाही का, असा सवाल करण्यात येत आहे. त्यामुळे एकतर पाणीपुरी विक्रेत्यांना नियमांचे पालन बंधनकारक करा किंवा चौकाचौकातील हे ठेले सक्तीने बंद करा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Panipuri cart becoming Corona hotspots in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.