नागपुरात ५० खासगी रुग्णालये मिळून उभारणार ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 07:30 AM2021-09-18T07:30:00+5:302021-09-18T07:30:02+5:30

Nagpur News विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या ५० सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्लांट रुग्णालयांच्या सेवेत असेल.

Oxygen plant to be set up in Nagpur with 50 private hospitals | नागपुरात ५० खासगी रुग्णालये मिळून उभारणार ऑक्सिजन प्लांट

नागपुरात ५० खासगी रुग्णालये मिळून उभारणार ऑक्सिजन प्लांट

googlenewsNext
ठळक मुद्देबुटीबोरीला होणार प्रकल्प‘एमएसएमई’कडून मिळणार अनुदान

राहुल लखपती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने, इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत ही स्थिती उद्भवू नये, म्हणून विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या ५० सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा प्लांट रुग्णालयांच्या सेवेत असेल. (Oxygen plant to be set up in Nagpur with 50 private hospitals)

कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. एका रुग्णाला दर मिनिटाला कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ७० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागत होता. १७८ मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे व विमानाची सेवा घ्यावी लागली, परंतु रुग्णसंख्येचा उच्चांक महिन्याभरातच कमी झाल्याने मोठा धोका टळला. ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, म्हणून न्यायालयाने ५० व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश दिले. परंतु, जागेची कमतरता व अनेक खासगी रुग्णालयांना स्वत:चे प्लांट उभारणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी ‘विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन’च्या (व्हीएचए) सदस्यांनी एकत्र येऊन बुटीबोरी एमआयडीसी येथे ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’च्या मदतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला.

- याच वर्षात प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

‘व्हीएचए’चे अध्यक्ष डॉ. अरबट म्हणाले, हा प्रकल्प याच वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकदा प्रकल्प सुरू झाल्यास खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा प्रश्न सुटेल. ‘व्हीएचए’चे समन्वयक डॉ. बी. के. मुरली म्हणाले, जागेची कमतरता असताना हॉस्पिटलच्या आवारात प्लांट उभारणे अवघड असून, खर्चिक आहे. यामुळे सदस्यांनी एकत्र येऊन हा प्लांट उभारण्यास पुढाकार घेतला आहे. यासाठी बुटीबोरी एमआयडीसीमध्ये तीन एकरची जागा उपलब्ध झाली असून, प्रकल्पासाठी ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’कडे (एमएसएमई) प्रस्ताव सादर केला आहे.

- ‘एमएसएमई’कडून ८० टक्के अनुदान

डॉ. मुरली म्हणाले, ऑक्सिजन प्लांटच्या एकूण खर्चाच्या २० टक्के (अंदाजे १२.५ कोटी रुपये) योगदान सदस्यांनी जमा केले आहे, तर ‘एमएसएमई’कडून उर्वरित ८० टक्के अनुदान मिळणार आहे.

- १५० रुग्णालयांना होणार मदत

‘व्हीएचए’चे डॉ. आलोक उमरे म्हणाले, हा प्लांट उभारण्यासाठी ५० सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. या प्लांटमधून १५० हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. शिल्लक साठा इतर रुग्णालयांना उपलब्ध करून दिला जाईल. दिवसाकाठी १,७०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची मदत या प्लांटमधून होणार आहे.

Web Title: Oxygen plant to be set up in Nagpur with 50 private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.