टिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 01:27 PM2020-10-14T13:27:03+5:302020-10-14T13:27:43+5:30

sanctuary in Tipeshwar,Yawatmal News तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे.

Outside the tiger sanctuary in Tipeshwar? | टिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर?

टिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर?

googlenewsNext

नरेश मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील वाघाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्यांचे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. त्याचप्रमाणे तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे. अन्नसाखळी तुटल्यामुळेच हे वाघ अभयारण्याबाहेर पडत असल्याचे बोलले जात आहे.
१५ हजार हेक्टरमध्ये विस्तारलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघांनी तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांना नेहमीच दहशतीखाली ठेवले आहेत. अभयारण्याला लागून असलेल्या शेतजमिनीच्या शेतमालकांना, शेतमजुरांना व सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: रडकुंडीस आणले आहे. वाघ व मानवामधील संघर्षामधे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष सतत वाढतच आहे. त्यामुळे वन्यजीव व मानवामधील संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलणे महत्वाचे आहे. तालुक्यातील टिपेश्वर या जंगलाला सन १९८७ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर टिपेश्वरमधील मारेगाव वन या गावाचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली झाल्या. बऱ्याच कालावधीनंतर गावकऱ्यांमध्ये वाटाघाटी होऊन मारेगाव वन या गावाचे पुनर्वसन करण्यात आले.

टिपेश्वरच्या जंगलामध्ये इतर वन्यप्राण्यांसह पट्टेदार वाघाचाही वावर होता. जंगलातील गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर अभयारण्याचे कामही वाढले. वाघांची संख्याही झपाट्याने वाढायला लागली.
आजमितीस टिपेश्वर अभयारण्यात एकूण २० वाघ आहेत. यामध्ये सात मोठे वयस्कर वाघ, १० वयस्क होण्याच्या मार्गावर असलेले वाघ व तीन बछड्यांचा समावेश आहे. १५ हजार हेक्टर जागेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात जास्तीत जास्त सात-आठ वाघ राहू शकतात. परंतु ही संख्या आजच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. वाघाच्या संख्येच्या मानाने टिपेश्वर अभयारण्यातील जागा ही अतिशय कमी पडत आहे. त्यामुळेसुद्धा वाघ अभयारण्याबाहेर पडत असून वन्यप्राणी व मानवामध्ये संघर्ष वाढत आहे.

अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणावर गावे लागून असल्याने या गावातील शेतशिवारामध्ये अभयारण्यातील रानडुकरे, हरिण, रोही आदी प्राणी शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करित आहे. आता या प्राण्यापाठोपाठ वाघांनीही धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. या वाघांना अभयारण्यात आपले भक्ष मिळत नसल्यामुळे ते सरळ गावशिवारात शिरतात. त्यामुळेच वाघाद्वारे जनावरांच्या व मानवांच्या शिकारीत वाढत होत आहे.

लाखो रूपयांचा निधी जातो तरी कुठे?
टिपेश्वर अभयारण्यातील वाघ व इतर प्राण्यांच्या पाणी व त्यांच्या शिकारीसाठी इतर महत्वाच्या व उपयुक्त कामासाठी तसेच प्राण्यांच्या सुविधेसाठी अभयारण्य प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होत असते. परंतु या निधीतून प्राण्यांच्या सुविधेसाठी व इतर उपाययोजनेसाठी किती खर्च केला जातो, हा संशोधनाचा विषय आहे. आतापर्यंत कोटयवधी रूपयांचा निधी खर्च करूनही अभयारण्यातील वाघांकरिता पुरेसे पाणी, शिकार व खाद्याची उत्पत्ती अभयारण्य प्रशासन करू शकले नाही, ही शोकांतिका आहे.

Web Title: Outside the tiger sanctuary in Tipeshwar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ