नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:47 IST2025-12-07T19:38:26+5:302025-12-07T19:47:03+5:30
विरोधी पक्षनेतेपद द्यायला आमचा विरोध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
CM Devendra Fadnavis on Opposition Leader: उपराजधानी नागपूर येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी सरकारच्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा चेंडू थेट अध्यक्ष आणि सभापतींच्या कोर्टात टाकला आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा निर्णय सरकारचा नसून विधानमंडळाच्या प्रमुखांचा आहे.
चहापानावर बहिष्कार, विरोधक आक्रमक
शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्याबद्दल आणि विरोधी पक्षनेता निवडला नसल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. सरकारमध्ये सौहार्द, सज्जनता नाही. विरोधी पक्षनेता निवडीवर सरकार गंभीर नाही," असा आरोप करत चहापानाला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी दिले प्रत्युत्तर
"विरोधीपक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्यासंदर्भात जो निर्णय अध्यक्ष आणि सभापती घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्याबाबत आमचा कुठलाही आग्रह आणि दुराग्रह नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा- एकनाथ शिंदे
"विरोधकांना जनतेने नाकारलं. विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढं संख्याबळही नाही दिले. त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. त्यामुळे त्यांनी पुढच्या वेळेस आणखी प्रयत्न केला पाहिजे. संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा. हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे, आमचा त्याला विरोध नाही," असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही, अशी इतिहासात पहिल्यांदाच वेळ आली आहे. विधान परिषदेत मागील सत्रात अंबादास दानवे विरोधी पक्षनेते होते, परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्याने तेथेही पद रिक्त आहे. विधानमंडळाच्या कामकाजाच्या पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडीचा कोणताही उल्लेख नाही. २८८ सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एका पक्षाकडे एकूण जागांपैकी किमान १० टक्के (२९) आमदार असणे आवश्यक आहे.