Onions disappear from onion uttapam and Poha | ओनियन उत्तपम व पोह्यातून कांदे गायब
ओनियन उत्तपम व पोह्यातून कांदे गायब

ठळक मुद्देकळमन्यात आवक घटलीठोक दर ९५ रुपये किलोपार

आनंद शर्मा
नागपूर : हिवाळ्याला सुरुवात की गरमागरम कांदीभजी, कांदेपोहे व ओनियन उत्तपमचा स्वाद आणखी वाढतो. परंतु कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे या पदार्थांमधून कांदे जवळपास गायब झाले आहेत. हॉटेल असो किंवा घर प्रत्येक ठिकाणी कांद्याचा कमीत कमी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. असे का होत आहे याची चाचपणी केली असता शहरातील ठोक कांदे बाजारात आवक घटल्याची बाब समोर आली. येणाऱ्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती आणखी वाढतील व ठोक बाजारात दर १२० हून जास्त होतील. २० डिसेंबरनंतर नवीन माल बाजारात येण्याची सुरुवात झाल्यावर दर हळूहळू कमी होतील.
साधारणत: या कालावधी कळमन्यात ३५ ते ४० गाडी भरुन कांद्याची आवक होते. मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे पिक खराब झाले. त्यामुळे सद्यस्थितीत कळमन्यात १५ ते १८ गाडी कांदेच येत आहेत. हे कांदे अहमदनगर, हुबळी, औरंगाबाद येथून येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना स्थित पं.जवाहरलाल नेहरु मार्केट यार्डातील कांदे बाजारामधील वरिष्ठ कांदे व्यापारी मोहम्मद मुंसिफ यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे कांद्याचा ८० टक्के माल खराब झाला आहे. कळमना बाजारात अतिशय बारीक व हलक्या दर्जाचे कांदे ठोकमध्ये २० ते २२ रुपये प्रति किलो या दराने विकल्या जात आहेत. तर उत्तम दर्जाचे कांदे ८५ रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. तर ‘स्टॉक’ करुन ठेवलेल्या जुन्या कांद्यांचा दर सर्वाधिक ९५ रुपये इतका सांगितला जात आहे. शेतकऱ्यांकडून थेट बाजारातून कांदे विकल्या जात असल्यामुळे नागपुरात इतर बाजारांच्या तुलनेत कमी आहेत.

२० डिसेंबरपर्यंत नवीन माल येणार
गुजरातमध्ये कांद्याचे भरपूर पिक झाले आहे. याची आवक सुरू झाली आहे. तर धुळे व औरंगाबाद येथील नवीन पिकाच्या कांद्याची आवक २० डिसेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज आहे. यानंतर हळू हळू दर कमी होतील, असे मोहम्मद मुंसिफ यांनी सांगितले.

विदेशी कांदे बेचव
विदेशातूनदेखील सरकारने कांदे मागविले आहेत.हे कांदे पुण्याच्या बाजारात उतरविण्यात आले. परंतु हे कांदे बेचव आहेत. त्यामुळे याची विक्री होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात याची आवक झालेली नाही.

प्रमुख बाजारात कांदे १४५ पार
कांद्याच्या प्रमुख बाजारांपैकी असलेल्या अहमदनगर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी कांद्याचा ठोक भाव १४५ रुपये बोलण्यात येत आहे. तर नागपुरात हे दर ९५ रुपये इतका आहे

 

Web Title: Onions disappear from onion uttapam and Poha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.