बालकांमध्ये दहा पटीने वाढला लठ्ठपणा; ‘ॲनिमिया’ग्रस्तांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 07:00 AM2021-12-09T07:00:00+5:302021-12-09T07:00:07+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात पाच वर्षांखालील मुलामुलींमध्ये चारच वर्षांत दहा पटीने लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या बालकांमध्ये ‘ॲनिमिया’च्या प्रमाणातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे.

Obesity increased tenfold in children; 25% increase in anemia sufferers | बालकांमध्ये दहा पटीने वाढला लठ्ठपणा; ‘ॲनिमिया’ग्रस्तांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ

बालकांमध्ये दहा पटीने वाढला लठ्ठपणा; ‘ॲनिमिया’ग्रस्तांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देपाच वर्षांखालील मुलामुलींमधील वास्तव

योगेश पांडे

नागपूर : मागील काही काळापासून लहान मुलामुलींमधील जंक फूडचे वाढते प्रमाण, खेळण्याचा अभाव इत्यादी बाबी चिंताजनक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. मात्र अनेक पालकांकडून बालकांच्या पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष होते. नागपूर जिल्ह्यात पाच वर्षांखालील मुलामुलींमध्ये चारच वर्षांत दहा पटीने लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या बालकांमध्ये ‘ॲनिमिया’च्या प्रमाणातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे.

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या आवृत्तीच्या अहवालातून (एनएचएफएस-५) ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१९-२० मध्ये नागपूर जिल्ह्यातील १०.१ टक्के लहान मुलामुलींचे (पाच वर्षांखालील) वजन जास्त होते. २०१५-१६ मध्ये हीच टक्केवारी अवघी १ टक्का इतकी होती. ३४ टक्के मुलांचे वजन उंचीच्या तुलनेत कमी होते. चार वर्षांअगोदर हेच प्रमाण २५.६ टक्के इतके होते. २० टक्के मुलेमुली, तर अतिकृश गटात येतात. या वयोगटातील ३३.९ टक्के बालके ही कृश होती.

याशिवाय ७०.५ टक्के लहान मुलामुलींमध्ये ‘ॲनिमिया’ आढळून आला. २०१५-१६ मध्ये हेच प्रमाण ४४.७ टक्के इतके होते. चारच वर्षांत मुलांमधील ‘ॲनिमिया’ २५.८ टक्क्यांनी वाढला.

केवळ साडेचार टक्के बालकांना मिळतोय योग्य आहार

दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना योग्य आहार मिळणे आवश्यक असते. मात्र नागपूर जिल्ह्यातील वास्तव फारच चिंताजनक आहे. सहा महिने ते २४ महिने या वयोगटातील केवळ ४.६ टक्के बालकांनाच आवश्यक पोषण आहार मिळतो आहे. २०१५-१६ मध्ये हीच संख्या ५.९ टक्के इतकी होती.

१०० टक्के लसीकरण नाहीच

१२ महिने ते २३ महिने या वयोगटातील बालकांचे १०० टक्के लसीकरण शक्य झालेले नाही. २०१९-२० मध्ये ८९.४ टक्के बालकांचेच लसीकरण झाले होते. २०१५-१६ मध्ये हा आकडा ७६.५ टक्के इतका होता. सर्व बालकांना बीसीजीची लस देण्यात यश आले आहे. चार वर्षांच्या कालावधीत खासगी केंद्रांवर लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१९-२० मध्ये २०.७ टक्के बालकांचे लसीकरण खासगी केंद्रांवर झाले. २०१५-१६ मध्ये हेच प्रमाण १५.८ टक्के इतके होते.

बालकांचे वजन (पाच वर्षांखालील)

वजन किंवा उंची : २०१९-२० : २०१५-१६

कमी उंची : २७.६ टक्के : ३३.९ टक्के

कमी वजन : ३४.० टक्के : २५.६ टक्के

अतिकृश : २०.० टक्के : १२.१ टक्के

अतिलठ्ठ : १०.१ टक्के : १.० टक्के

बालकांचे लसीकरण (१२ ते २४ महिन्यांपर्यंत)

लस : २०१९-२० : २०१५-१६

बीसीजी : १०० टक्के : ९६.१ टक्के

पोलियो (३ डोस) : ९४.७ टक्के : ८४.३ टक्के

डीटीपी : ९५.१ टक्के : ८९.५ टक्के

एमसीव्ही : ९४.५ टक्के : ९२.१ टक्के

हेपाटायटीस बी : ८८.३ टक्के : ८८.४ टक्के

सार्वजनिक केंद्रांत लस : ७९.३ टक्के : ८४.३ टक्के

खासगी केंद्रांत लस : २०.७ टक्के : १५.८ टक्के

 

Web Title: Obesity increased tenfold in children; 25% increase in anemia sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य