ना फूड पार्क आला, ना ऑरेंज उन्नती प्रकल्प झाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 07:00 AM2020-12-01T07:00:00+5:302020-12-01T07:00:15+5:30

प्रक्रिया उद्याेगांचा अभाव, घटलेली मागणी आणि बाजारात वाढलेली आवक यामुळे अंबिया बहाराच्या संत्र्याचे दर काेसळले आहेत. चार वर्षांपूर्वी पायाभरणी झालेले दोन्ही दाेन संत्रा प्रक्रिया प्रकल्प रखडल्याने, ही स्थिती उदभवल्याचे संत्रा उत्पादकांचे म्हणणे आहे.

No food park, no Orange Upliftment Project! | ना फूड पार्क आला, ना ऑरेंज उन्नती प्रकल्प झाला !

ना फूड पार्क आला, ना ऑरेंज उन्नती प्रकल्प झाला !

Next
ठळक मुद्दे संत्र्याचे भाव कोसळले; उत्पादक संकटातप्रक्रिया उद्याेग रखडले

सुनील चरपे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रक्रिया उद्याेगांचा अभाव, घटलेली मागणी आणि बाजारात वाढलेली आवक यामुळे अंबिया बहाराच्या संत्र्याचे दर काेसळले आहेत. चार वर्षांपूर्वी पायाभरणी झालेले दोन्ही दाेन संत्रा प्रक्रिया प्रकल्प रखडल्याने, ही स्थिती उदभवल्याचे संत्रा उत्पादकांचे म्हणणे आहे.

मुळात विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्याेगाचा अभाव आहे. बाजारात मध्यम व छाेट्या आकाराच्या संत्र्यांना फारशी मागणी नाही. भाव काेसळले आहेत. विदर्भातील ‘कॅलिफाेर्निया’ची वाताहत सुरूच आहे. दीड लाख हेक्टरवर लागवड असलेल्या संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूरच्या ‘मिहान’ परिसरात पतंजली आयुर्वेदच्या मदतीने आधुनिक ‘फूड पार्क’, तसेच जैन फार्म फ्रेश फूड व हिंदुस्थान काेका काेला बेव्हरेजच्या भागीदारीत अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यात ठाणाठुणी येथे ‘ऑरेंज उन्नती’ प्रकल्पाची अनुक्रमे ३१ ऑगस्ट २०१६ व ३० डिसेंबर २०१६ राेजी मुहूर्तमेढ राेवल्या गेली.

या प्रकल्पांमध्ये मध्यम व छाेट्या आकाराच्या अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचा ‘ज्यूस’ तयार करून त्याचा विविध उत्पादनांमध्ये वापर तसेच काही स्वतंत्र उत्पादने केली जाणार असल्याचे संत्रा उत्पादकांना सांगण्यात आले हाेते. परंतु चार वर्षात दाेन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित हाेणे अपेक्षित असताना त्यांचे काम तसूभरही पुढे सरकले नाही. पतंजलीने मिहानच्या जागेवर शेड उभारले असले तरी संत्र्यावर प्रक्रिया करण्याऐवजी इतर उत्पादनांच्या ‘पॅकिंग’साठी केला जात असल्याची आहे.

जैन फार्म फ्रेश फूड व हिंदुस्थान काेका काेला बेव्हरेजने ठाणाठुणी येथे केवळ ‘नर्सरी’ तयार केली असून, त्यांनी शेतकऱ्यांना संत्र्याची प्रति कलम २५० रुपयाप्रमाणे ‘व्हॅलेन्सिया’ जातीच्या कलमा विकल्या आहेत. त्या झाडांना फलधारणा व्हायला सुरुवात झाली असून, ‘व्हॅलेन्सिया’ जातीचा संत्राही कुणी खरेदी करायला तयार नाही. मध्यम व छाेट्या आकाराचा संत्रा ही माेठी समस्या आहे. हे दाेन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले असते, तर ती समस्या सुटली असती.

आधुनिक फूड पार्क

प्रकल्प किंमत - १,००० काेटी रुपये

अधिग्रहित जमीन - २३० एकर

संत्रा प्रक्रिया क्षमता - १,००० टन (प्रति दिन)

उद्देश - संत्री, टाेमॅटाे, काेरफड, औषधी वनस्पती व वनउपज यावर प्रक्रिया करणे, शेतकरी व आदिवासींना प्रशिक्षण देणे, त्यांना खरेदीची हमी देणे

ऑरेंज उन्नती प्रकल्प

प्रकल्प किंमत - १५० काेटी रुपये

अधिग्रहित जमीन - १०० एकर

संत्रा प्रक्रिया क्षमता - ५०० टन (प्रति दिन)

उद्देश - संत्रा प्रक्रिया, राेपवाटिकेत पाच वेगळ्या जातीच्या संत्र्याच्या प्रक्रिया केलेल्या कलमा विकसित करून शेतकऱ्यांना देणे, प्रशिक्षण व खरेदीची हमी देणे

दाेन्ही प्लान्ट तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. प्लान्ट उभारताना केलेल्या घाेषणा हवेत विरल्या आहेत. यात सरकारने कंपन्यांना अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यामुळे ते पूर्ण करण्याची ‘डेडलाईन’ सरकारने द्यायला हवी हाेती. सर्वपक्षीय नेत्यांनी संत्रा हा राजकारणाचा विषय न करता एकत्र येऊन ही समस्या साेडवायला हवी.

- मनाेज जवंजाळ

अध्यक्ष, नागपुरी संत्रा फार्मर प्राेड्यूसर कंपनी, काटाेल.

उत्पादन खर्चही निघेना

संत्र्याला बाजारात प्रति टन १० ते १२ हजार भाव मिळाल्यास त्याचा केवळ उत्पादन खर्च भरून निघताे. शेतकऱ्याला नफा मिळत नाही. सध्या बाजारात संत्र्याला १० ते १३ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. यावर्षी सप्टेंबर, ऑक्टाेबरमध्ये पाऊस सुरू असल्याने संत्रा ताेडणे शक्य झाले नाही. या काळात संत्र्याला अधिक मागणी असते. नाेव्हेंबरमध्ये संत्रा बाजारात यायला सुरुवात झाली. प्रतिकूल हवामानामुळे संत्र्याचा आकार, रंग व चव यात थाेडा बदल झाला. बाजारात पुरवठा वाढल्याचे संत्र्याचे दर काेसळले. दाेन्ही प्रकल्प सुरू असते तर आज संत्र्याचे प्रति टन दर २० ते २८ हजार रुपयावर स्थिर राहिले असते.

Web Title: No food park, no Orange Upliftment Project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती