‘एनएमआरडीए’चा नासुप्रवर आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:08 AM2019-11-25T11:08:24+5:302019-11-25T11:09:23+5:30

नागपूर जिल्ह्यातील ७२१ गावांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) स्वतंत्र कारभार आहे. यासोबतच नासुप्रच्या योजना एनएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहे.

NMRDA's financial burden on NIT | ‘एनएमआरडीए’चा नासुप्रवर आर्थिक भार

‘एनएमआरडीए’चा नासुप्रवर आर्थिक भार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ७२१ गावांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) स्वतंत्र कारभार आहे. यासोबतच नासुप्रच्या योजना एनएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहे. विकास प्रकल्पांसाठी निधी हस्तांतरित करण्यात आला. कामकाजासाठी नासुप्रतील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. विकास शुल्काच्या माध्यमातून एनएमआरडीएचा आस्थापना खर्च व विकास योजना राबविणे अपेक्षित होते. मात्र अद्याप विकास शुल्क भरण्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन व आस्थापना खर्च नासुप्रच्या निधीतून केला जात आहे.
शहरातील ५७० व १९०० अभिन्यासातील विकास कामांसाठी भूखंड नियमितीकरणाच्या माध्यमातून भूखंडधारकांकडून वसूल करण्यात आलेला निधी या भागातील मूलभूत सुविधावर खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून शहरातील नागरी सुविधांची कामे ठप्पच आहे. भूखंडधारकांनी नासुप्रच्या तिजोरीत जमा केलेला निधी एनएमआरडीएच्या आस्थापनावर खर्च होत आहे. दुसरीकडे अजूनही शहरातील असंख्य ले-आऊ टमधे पिण्याचे पाणी, रस्ते,सिवरेज, पावसाळी नाल्या, पथदिवे अशा मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. दुसरीकडे विकासाच्या नावाखाली वसूल करण्यात आलेला निधी अन्य कामांवर खर्च केला जात आहे.
नासुप्रची आवक थांबली
बरखास्तीची प्रक्रिया सुरू असल्याने नासुप्रचे विकास प्राधिकरणाचे शहरातील अधिकार संपुष्टात आले आहे. त्यामुळे भूखंड नियमितीकरण्याच्या माध्यमातून नासुप्रच्या तिजोरीत जमा होणारा महसूल थांबला आहे. आवक बंद झाली पण खर्च सुरू असल्याने नासुप्रच्या गंगाजळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे. नासुप्र कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती, पेन्शन व दायित्वासाठी हा निधी राखून ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे एमएमआरडीएच्या तिजोरीतही अपेक्षित महसूल जमा होताना दिसत नाही. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास भविष्यात नासुप्रच्या तिजोरीत फारसा निधी शिल्लक राहणार नाही, अशी माहिती नासुप्रतील अधिकाऱ्यांनी दिली.
विकासासाठी निधी पण आस्थापनाचा भार नासुप्रवर
‘एनएमआरडीए’चा स्वतंत्र अर्थसंकल्प गेल्या दोन वर्षापासून सादर केला जात आहे. एनएमआरडीएच्या माध्यमातून वित्त वर्षात रिंग रोड जंक्शनवर लॉजिस्टिक पार्क उभारणे, विभागीय कार्यालयांची स्थापना, कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे, महानगर क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे उभारणे, कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारणे, स्वदेश योजनेंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आदी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे तसेच फुटाळा तलाव परिसराचे सुशोभिकरण यासह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध केला जात आहे. परंतु आस्थापना खर्च नासुप्रला करावा लागत आहे.

Web Title: NMRDA's financial burden on NIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.