वनविभाग कार्यालयात ना येण्याची वेळ, ना जाण्याची; लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 12:40 PM2021-11-30T12:40:22+5:302021-11-30T12:51:40+5:30

तालुक्यात बहुसंख्याक नागरिक शेतकरी आहेत. त्यांना विविध कामांनिमित्त तालुका स्तरावरील वनविभागाच्या कार्यालयांत विविध कामांकरिता यावे लागते. परंतु कार्यालयात कुणीच उपलब्ध राहत नसल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात.

narkhed forest office employee not following the office time rule | वनविभाग कार्यालयात ना येण्याची वेळ, ना जाण्याची; लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कुणाचा?

वनविभाग कार्यालयात ना येण्याची वेळ, ना जाण्याची; लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कुणाचा?

googlenewsNext
ठळक मुद्देनरखेड येथील वास्तव

श्याम नाडेकर

नागपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नरखेड येथे सोमवारी (दि.२९) दुपारी १२ वाजता दरम्यान फेरफटका मारला असता कार्यालय ओसाड पडले होते. सहा अधिकाऱ्यांसह ३८ कर्मचारी असलेल्या या कार्यालयात फक्त एक कामडी नावाचे वनमजूर व ३ रोजंदारी संगणक चालक उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे दालन कुलूप बंद होते. कार्यालय परिसरात क्षेत्र सहायक अधिकारी व वनरक्षक यांचे निवासस्थान आहे. तिथेही कुणीच नव्हते. कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य होते.

कार्यालयातील एकमेव लिपिक सकाळी ९.३० वाजता कार्यालयात आले. मात्र तेही १२ अगोदर कार्यालयातून निघून गेले होते. सखोल चौकशी केली असता वनविभागाच्या कार्यालयात येण्याची किंवा जाण्याची कोणतीही वेळ नाही. कार्यालयात कर्मचाऱ्यांकरिता हजेरीपट नाही. त्यामुळे कामावर आले किंवा नाही आले तरी काही फरक पडत नाही. प्रत्येक कर्मचारी हा ऑनड्युटीच राहतो. कार्यालयाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. भिवगडे आहेत. त्यांचे निवासस्थान कार्यालयाच्या बाजूलाच आहे परंतु ते कधीच दालनात स्थानापन्न नसतात. त्यांच्याऐवजी वनपाल गस्ती पथक आर. आर. डोंगरे हेच कार्यालयाचा कारभार चालवितात, अशी नागरिकांची ओरड आहे.

तालुक्यात बहुसंख्याक नागरिक शेतकरी आहेत. त्यांना विविध कामांनिमित्त तालुका स्तरावरील वनविभागाच्या कार्यालयांत विविध कामांकरिता यावे लागते. परंतु कार्यालयात कुणीच उपलब्ध राहत नसल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात. कार्यालयात हजेरीपट किंवा हलचल रजिस्टर नसल्यामुळे कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याबद्दल विचारणा केली असता आता दौऱ्यावर आहेत, बिटमध्ये गेले आहे, असे उत्तर नागरिकांना मिळते.

एका सहीकरिता सामान्य नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागतात. याउलट लाकूड, डिंक, आरागिरणी , तेंदूपत्ता व्यावसायिक किंवा कंत्राटदारांना मात्र वाटेल तेव्हा वाटेल तिथे सही मिळते हे सत्य आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यात थंडीपवनी रस्त्यावर मृत बिबट्या मिळाला होता. नागरिकांनी सूचना देऊनही एकही वनधिकारी घटनास्थळी वेळेवर पोहोचला नव्हता.

अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयासोबत नरखेडपासून शेकडो किलोमीटर लांब त्यांच्या घरी असतात. मात्र, नोंद ड्युटीवर असल्याची असते. अधिकारी अनुपस्थित असले तरी लाकूड व्यापाऱ्यांना ट्रान्झिट पासवर त्यांची सही मिळते हे गौडबंगाल काय आहे, हे कळायला मार्ग नाही. अधिकारी कोऱ्या ट्रान्झिट पासवर सह्या तर नाही करून ठेवीत? अशी शंका घ्यायला वाव आहे.

४२ पैकी केवळ ४ हजर

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नरखेडला वनपरिक्षेत्र अधिकारी एक, वनपाल गस्ती पथक १, क्षेत्र सहायक अधिकारी ४ , वनरक्षक १२, लिपिक १ , वनमजूर २० व ३ रोजंदारी संगणक चालक असा एकूण ४२ कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. सोमवारी दुपारी कार्यालयात केवळ एक वनमजूर व तीन संगणक चालक उपस्थित होते.

पाचजण दुपारच्या जेवणाला घरी

कार्यालयात नेहमी उपस्थित असणारा एकमेव लिपिक व ३-४ वनमजूर दुपारच्या जेवणाला घरी गेल्याचे समजले.

एक दौऱ्यावर बाकी बिटमध्ये

कार्यालय प्रमुख आर. पी. भिवगडे एक वनमजूर घेऊन खापा बिटमध्ये दौऱ्यावर तर ४ क्षेत्र सहायक अधिकारी आपापल्या बिट कार्यालयात असल्याची माहिती मिळाली; परंतु नरखेड क्षेत्राचे सहायक अधिकारी, वनरक्षक कार्यालयात अनुपस्थित होते.

दोन महिन्यांपासून मारते चकरा

वन्यप्राण्यांकडून शेतात झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईकरिता दोन महिन्यांपूर्वी अर्ज दिला आहे. अजूनपर्यंत भरपाई मिळाली नाही. आजवर शेतातील कामे सोडून अनेकदा कार्यालयात आलो. आजही शेतातील काम सोडून आले परंतु कार्यालयात कोणीच नसल्यामुळे परत जावे लागत आहे.

-कुसूम सकर्डे, महिला शेतकरी, नरखेड

मी जलालखेडा परिसरात दौऱ्यावर आहे. क्षेत्र अधिकारी वनरक्षक त्यांच्या बिटमध्ये आहेत. त्यामुळे कार्यालयातील उपस्थितीबाबत अनभिज्ञ आहे. कार्यालयात आल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतो.

आर. पी. भिवगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी,नरखेड.

Web Title: narkhed forest office employee not following the office time rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.