नागपुरातील गुन्हेगारांच्या ‘टॉप टेन’ टोळ्या अधोरेखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:44 PM2019-07-23T23:44:47+5:302019-07-23T23:45:39+5:30

उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून पोलिसांची डोकेदुखी वाढवणाऱ्या गुन्हेगारांची गुन्हेगारी ठेचून काढण्याची जोरदार तयारी पोलिसांनी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील गुन्हेगारांच्या ‘टॉप टेन’ टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांची यादी तयार करण्यात आली आहे. चार दिवसात त्यातील दोन खतरनाक म्होरक्यांना पोलिसांनी अटक करून आक्रमकतेचा परिचय दिला आहे.

Nagpur's criminals 'top ten' gangs underlined | नागपुरातील गुन्हेगारांच्या ‘टॉप टेन’ टोळ्या अधोरेखित

नागपुरातील गुन्हेगारांच्या ‘टॉप टेन’ टोळ्या अधोरेखित

Next
ठळक मुद्देडोकेदुखी संपवण्यासाठी पोलीस आक्रमक : चार दिवसात दोन म्होरके गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून पोलिसांची डोकेदुखी वाढवणाऱ्या गुन्हेगारांची गुन्हेगारी ठेचून काढण्याची जोरदार तयारी पोलिसांनी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील गुन्हेगारांच्या ‘टॉप टेन’ टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांची यादी तयार करण्यात आली आहे. चार दिवसात त्यातील दोन खतरनाक म्होरक्यांना पोलिसांनी अटक करून आक्रमकतेचा परिचय दिला आहे.
शहरात अनेक सराईत गुन्हेगार आहेत. त्यातील १०० वर गुन्हेगार वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागले असून, हे गुन्हेगार नागपुरात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. जमिनी बळकावणे, बंगले, सदनिकांवर कब्जे करणे, अपहरण करून लाखोंची खंडणी उकळणे, धाक दाखवून खंडणी मागणे, अवैध दारू विक्रीचे गुत्ते, जुगार, मटका अड्डे चालवून हेच गुन्हेगार लाखो रुपये कमवित आहेत. याच पैशातून अमली पदार्थ, डान्स बार, शस्त्र तस्करी, कोळसा तस्करी करणाऱ्यांनाही ते बळ देत आहेत. एवढेच नव्हे तर पैशासाठी आणि आपले वर्चस्व वाढवण्यासाठी ते एकमेकांची हत्याही करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात त्यांनी उपराजधानीच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पाडून प्रचंड दहशत निर्माण केली. ते वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करीत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर तडीपारी, एमपीडीएसारखी कारवाई करतात. मात्र, अनेक तडीपार गुंड शहरातच वास्तव्याला असतात. ते येथे नुसते राहतच नाही तर गुन्हेगारीत सक्रिय राहून अवैध धंद्यांचेही संचालन करतात. त्यांची ही डावबाजी लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी बनविली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुन्हेगारांच्या १० प्रमुख टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गुन्हेगारांच्या हालचालीवर तीक्ष्ण नजर ठेवण्याचे आणि संधी मिळताच त्यांच्या मुसक्या आवळण्याचे कडक आदेश गुन्हे शाखाच नव्हे तर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाºयांना देण्यात आले आहे.
गुन्हेगारांच्या टिपरवरही नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस चांगले सक्रिय झाले आहे. त्याचे चांगले परिणाम समोर आले आहे. अवघ्या चार दिवसात गुन्हेगारांच्या दोन प्रमुख टोळ्यांचे दोन म्होरके पोलिसांच्या हाती लागले आहेत. शुक्रवारी, १९ जुलैला इप्पा टोळीचा म्होरक्या, खतरनाक गुंड शेख नौशादला पोलिसांनी पकडले तर, मंगळवारी २३ जुलैला खतरनाक माया गँगचा म्होरक्या सुमित चिंतलवारला जेरबंद केले. त्यांच्या अटकेमुळे आता त्यांच्या फरार गुंड साथीदारांना पकडणे पोलिसांना सोपे झाले आहे. अन्य वॉन्टेड गुन्हेगारांच्या टोळ्यांवरही पोलिसांनी नजर रोखली असून, लवकरच आणखी एक म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याचे संकेत संबंधित सूत्रांनी दिले आहेत.
मकोकाचा दणका
नौशाद हा मकोकाचा आरोपी आहे. त्यामुळे त्याची चौकशी आटोपल्यानंतर मकोकाअंतर्गत पोलीस त्याला कारागृहात डांबणार आहेत. दुसरीकडे सुमित चिंतलवारविरुद्धही पोलीस मकोकाची कारवाई करणार असून, पुढच्या काही तासात विजय मोहोड हत्याकांडातील आरोपींवरही पोलीस मकोका लावणार आहे.

Web Title: Nagpur's criminals 'top ten' gangs underlined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.