कोरोनाविरुद्ध लढ्यात नागपूरकर डॉक्टरची मुंबईत सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 09:30 PM2020-03-21T21:30:35+5:302020-03-21T21:31:26+5:30

नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असताना डॉक्टर मात्र समर्पित भावनेने देवदूतांप्रमाणे सेवेत लागलेले आहेत. नागपूरचे डॉ. यश अविनाश बानाईत हे सुद्धा त्या समर्पण वृत्तीचे एक नाव होय. डॉ. यश हे गेल्या ७ मार्चपासून मुंबई येथे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना स्क्रिनिंग आणि इतर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

Nagpurian Doctor's service in Mumbai in the fight against Corona | कोरोनाविरुद्ध लढ्यात नागपूरकर डॉक्टरची मुंबईत सेवा 

कोरोनाविरुद्ध लढ्यात नागपूरकर डॉक्टरची मुंबईत सेवा 

Next
ठळक मुद्देएअरपोर्ट टर्मिनलवर ७ मार्चपासून सेवारत : यश बानाईत यांच्या समर्पणाचा शहरवासीयांना अभिमान

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूने महामारीचे रूप धारण करीत संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असताना डॉक्टर मात्र समर्पित भावनेने देवदूतांप्रमाणे सेवेत लागलेले आहेत. नागपूरचे डॉ. यश अविनाश बानाईत हे सुद्धा त्या समर्पण वृत्तीचे एक नाव होय. डॉ. यश हे गेल्या ७ मार्चपासून मुंबई येथे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना स्क्रिनिंग आणि इतर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
वैद्यकीय पदवी घेताना प्रत्येक विद्यार्थी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करण्याची शपथ घेत असतो. त्याचीच प्रचिती सध्या आलेल्या परिस्थितीत पावलोपावली येत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि क्षणाक्षणाला ही भीती आणखी गडद होत चालली आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा सर्वाधिक धोका परदेश प्रवासातून आलेल्यांमध्ये आहे. त्यामुळे या प्रवाशांची कोरोना स्क्रिनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. हीच जबाबदारी डॉ. यश बानाईत यांच्यावर आहे. डॉ. यश हे मुंबईच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायनमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक २ मध्ये ७ मार्चपासून सेवारत आहेत. प्रवाशांच्या कोरोना स्क्रिनिंगसह इतर डॉक्टरांची पोस्टींग व इतर कार्याच्या निरीक्षणाची जबाबदारी पाहत आहेत. दहशतीच्या अशा भीषण परिस्थितीत डॉ. यश हे मोठ्या नेटाने आपली सेवा देत आहेत.
एका भयावह विषाणूविरुद्ध एक प्रकारचे विश्वयुद्ध सुरू आहे आणि या युद्धात रुग्णालयांमध्ये सेवा देणारे डॉक्टर आणि नर्सेस सर्वात पुढे असलेले सैनिक आहेत. या परिस्थतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉ. यश बानाईत यांचे सेवाकार्य प्रत्येक नागपूरकराला अभिमान वाटावा असेच आहे. इतर डॉक्टरांसमवेत त्यांचेही कार्य खऱ्या अर्थाने घेतलेल्या शपथेचे निर्वहन करण्यासारखे आहे. या वैद्यकीय सैनिकांचे कार्य दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील.

Web Title: Nagpurian Doctor's service in Mumbai in the fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.