उपराजधानीत रंगला गुढीपाडवा उत्सव सोहळा :मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:11 PM2019-04-06T23:11:06+5:302019-04-06T23:34:55+5:30

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा शनिवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला-पुरुषांनी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतनही केले. शहरातील विविध संघटनांतर्फे सकाळी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुका आयोजित करण्यात आल्या होत्या तर विविध भागात पाडवा पहाटचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्याच्या मैफिलीही रंगल्या.

Nagpurat Rangala Gudi Padwad Utsav Sohala: Welcome to the celebration of New Year's Day | उपराजधानीत रंगला गुढीपाडवा उत्सव सोहळा :मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

गुढीचा थाट : आनंदाची उधळण अन सुखांची बरसात करणारा. यानिमित्ताने मानकापुरातील मूर्र्तिकार अभय घुसे यांची कन्या आर्टिस्ट गायत्री घुसे हिने सोन्याचा मुलामा देऊन कलात्मक गुढी साकारली आहे. या गुढीत २०० रत्न जडविण्यात आले असून ही गुढी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Next
ठळक मुद्देशुभेच्छा, बाईक रॅली, ढोलताशा पथकाचा गजर, पाडवा पहाटचे सूरही निनादले

नागपूर : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा शनिवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला-पुरुषांनी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतनही केले. शहरातील विविध संघटनांतर्फे सकाळी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुका आयोजित करण्यात आल्या होत्या तर विविध भागात पाडवा पहाटचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्याच्या मैफिलीही रंगल्या. 


गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. शनिवारी या सणाचे उत्साही रूप नागपुरात बघायला मिळाले. सूर्योदयानंतर दारामध्ये गुढी उभारून नागरिकांनी मनोभावे पूजा केली आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. दारात आणि अंगणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या रांगोळ््या काढण्यात आल्या. 


पहाटेच्या समयी अनेक भागात नागरिकांनी चौकात येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान विविध संघटनांतर्फे शहरात मिरवणुका काढून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. विविध भागातून तरुणांनी मोटरसायकल रॅली काढून हा आनंदोत्सव साजरा केला. यात महिलासुद्धा मागे नव्हत्या. नऊवारी साडी नेसलेल्या महिला व तरुणी या मिरवणुकांमध्ये उत्साहात सहभागी झाल्या होत्या. 

ढोल-ताशा पथकदेखील सहभागी झाले. ढोल-ताशांचा गजर, वेत्रचर्म आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके पाहण्यासोबत शोभायात्रेचे स्वागत करण्याकरिता मोठी गर्दी केली. विविध सांस्कृतिक संस्थांच्यावतीने पाडवा पहाटच्या संगीत मैफिली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी केले. 

आलाप संगीत विद्यालयात गुढीपाडवा पहाट
नवीन सुभेदार ले-आऊटस्थित आलाप संगीत विद्यालयातर्फे उमरेड रोडवरील पंचवटी वृद्धाश्रमात गुढीपाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुगम संगीत व शास्त्रीय संगीतावर आधारित भक्तिगीते सादर केली. शारदा स्तवन व सिद्धलक्ष्मी स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे विद्यार्थ्यांनी ‘उठी उठी गोपाळा..., प्रभाती सूर नभी रंगती..., पायोजी मैने..., देव देव्हाऱ्यात नाही..., चांदणे शिंपित..., उठा राष्ट्रवीर हो...’ अशी गाणी सादर करून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंद दिला. ज्येष्ठांनीही अनेक गीतांची फर्माईश केली. कार्यक्रमाची संकल्पना अंजली व श्याम निसळ यांची होती. यावेळी विभाताई टिकेकर, मेजर हेमंत जकाते, भागवत, मुलमुले, डॉ. संजय धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदन वीणा मानकर व सुनिता वंजारी यांनी केले. आयोजनात मनीषा देशकर, मनोज घुशे, भावना इंगोले, मंदार मुळे आदींचा सहभाग होता. शिवांगी ढोक यांनी आभार मानले.
शिवतीर्थावर गुढीपाडवा नववर्ष जल्लोषात साजरे 

छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाल नागपूर येथे गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळी शिवरायांच्या पुतळ्याला पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणेश डोईफोडे यांच्या नेतृत्वात शिवसाम्राज्य ढोलताशा पथक व शिवाज्ञा ढोलताशा पथकाद्वारे शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी देवेंद्र घारपेडे, किल्लेकार, विशाल देवकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनात दिलीप दिवटे, दत्ता शिर्के, महेश महाडिक, प्रवीण घरजाळे, विवेक पोहाणे, विवेक सूर्यवंशी, जय आसकर, कुशांक गायकवाड, पंकज वाघमारे, विजय राजूरकर, सुमित भोयर, स्वराज कन्हेरे, साहिल काथवटे, योगेश शाहू, वेदांत गेटमें, अभिषेक सावरकर, प्रणय पांढरे, अक्षय ठाकरे, सोहम कळमकर, रोहित मोऊंदेकर, प्रज्वल काळे, आशिष चौधरी, सुधांशु ठाकरे, हरीश निमजे आदींचा सहभाग होता.
अस्तित्व फाऊंडेशनतर्फे वाहन रॅली 

अस्तित्व फाऊंडेशन आणि भारतीय महिला विकास संघातर्फे हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त महिलांची वाहन रॅली काढण्यात आली. यावेळी संयोजिका अरुणा आवळे, मंजू हेडाऊ, अश्विनी पांडे यांनी मार्गदर्शन केले. ३०० पेक्षा अधिक महिला या वाहन रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. शांतिनगरच्या गजानन मंदिरात भारत मातेचे पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रकाश हेडाऊ, नगरसेवक प्रवीण भिसीकर, संजय चावरे, अनिल राजगिरे, किरण पांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे परिसर भ्रमण करून त्याच ठिकाणी समारोप करण्यात आला.

 

Web Title: Nagpurat Rangala Gudi Padwad Utsav Sohala: Welcome to the celebration of New Year's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.