नागपूर जिल्हा परिषद : शिक्षक बदल्यांवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:40 AM2020-10-17T00:40:35+5:302020-10-17T00:50:57+5:30

ZP school teacher transfer विस्थापित आणि रॅण्डमच्या शिक्षकांच्या पदस्थापनेवरून बदल्यांची प्रक्रिया चांगलीच गाजली. पण प्रत्यक्षात बदलीच्या प्रक्रियेत विस्थापित आणि रॅण्डमच्या शिक्षकांनी अत्यल्प सहभाग घेतल्याने बदल्यांच्या वादाला संघटनांनी उगाचच भडका दिला, अशी भावना प्रशासनाने व्यक्त केली.

Nagpur Zilla Parishad: Dispute on teacher transfers | नागपूर जिल्हा परिषद : शिक्षक बदल्यांवरून वाद

नागपूर जिल्हा परिषद : शिक्षक बदल्यांवरून वाद

Next
ठळक मुद्देविस्थापित व रॅण्डम शिक्षकांचा अत्यल्प सहभागरिक्त ८६ जागा भरल्या : महिला व सेवा ज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्य

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : विस्थापित आणि रॅण्डमच्या शिक्षकांच्या पदस्थापनेवरून बदल्यांची प्रक्रिया चांगलीच गाजली. पण प्रत्यक्षात बदलीच्या प्रक्रियेत विस्थापित आणि रॅण्डमच्या शिक्षकांनी अत्यल्प सहभाग घेतल्याने बदल्यांच्या वादाला संघटनांनी उगाचच भडका दिला, अशी भावना प्रशासनाने व्यक्त केली. जिल्हा परिषदेला ९० रिक्त जागांवर पदस्थापना द्यायची होती. शुक्रवारी ८६ रिक्त जागांवर पदस्थापना देण्यात आली. शांततेत प्रक्रिया पार पडल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला. यात विस्थापित व रॅण्डमच्या ५४ शिक्षकांना पदस्थापना मिळाली. विशेष म्हणजे जिल्ह्यात रॅण्डम व विस्थापितचे २४३ शिक्षक होते. यातील केवळ ५४ शिक्षकांनीच अर्ज केले होते. शिक्षक संघटनांनी बदल्यांपूर्वी संपूर्ण रिक्त जागा खुल्या करा, असा सूर आळवल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज येतील अशी अपेक्षा होती. फक्त ५४ अर्ज आल्याने प्रशासनाने त्यांना प्राथमिकता देत समुपदेशनाने त्यांनी निवडलेल्या पर्यायी शाळेत पदस्थापना दिली. त्याचबरोबर आंतर जिल्हा बदलीने आलेल्या ४० शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. तर सरळ सेवा भरतीने ४६ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देताना महिला शिक्षकांना व सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. बदलीच्या प्रक्रियेत सीईओ योगेश कुंभेजकर हे स्वत: होते. त्यांच्याबरोबर अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, अति. सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, सभापती भारती पाटील, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते.

आदिवासी व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरल्या

२०१८ मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांना दुर्गम आदिवासी व अवघड क्षेत्रात टाकले होते. तेव्हापासून हे शिक्षक वेळोवेळी बदल्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर सरळ सेवा भरतीची प्रक्रिया प्रशासनाला राबवायची होती. त्यात विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांना संधी दिली. या शिक्षकांनी जवळचे तालुके निवडले. त्यामुळे सरळ सेवा भरतीने आलेल्या शिक्षकांना आदिवासी व अवघड क्षेत्रात पदस्थापना दिल्याने तेथील बॅकलॉग संपविण्यात आला.

 श्रेणीनिहाय झालेल्या बदल्या

विस्थापित व रॅण्डम श्रेणी

पुरुष १३

महिला ४१

आंतरजिल्हा बदली श्रेणी

पुरुष - २४

महिला - १६

सरळ सेवा भरती श्रेणी

पुरुष - ३९

महिला - ७

Web Title: Nagpur Zilla Parishad: Dispute on teacher transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.