नागपूर विद्यापीठ : तीनच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या अर्जांत तिपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 09:41 PM2020-01-13T21:41:08+5:302020-01-13T21:42:30+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

Nagpur University: There has been a threefold increase in revaluation applications in three years | नागपूर विद्यापीठ : तीनच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या अर्जांत तिपटीने वाढ

नागपूर विद्यापीठ : तीनच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या अर्जांत तिपटीने वाढ

Next
ठळक मुद्देअर्जांच्या माध्यमातून कोट्यवधींचा महसूल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. संबंधित प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे मागील काही कालावधीपासून फेरमूल्यांकनासाठी येणाऱ्या अर्जांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. २०१६ च्या उन्हाळी परीक्षांच्या तुलनेत २०१९ च्या उन्हाळी परीक्षांच्या निकालानंतर फेरमूल्यांकनासाठीच्या अर्जांमध्ये तब्बल ३०९ टक्के म्हणजेच तिपटीने वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत विद्यापीठाकडे फेरमूल्यांकनासाठी किती अर्ज आले, यातील किती अर्ज नाकारण्यात आले, फेरमूल्यांकनासाठीच्या अर्जांतून किती महसूल प्राप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन कक्षाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २०१६ च्या उन्हाळी परीक्षेत विद्यापीठाकडे फेरमूल्यांकनासाठी ११ हजार ११६ अर्ज आले होते. त्यानंतर प्रत्येक परीक्षेत अर्जांची संख्या वाढत गेली. २०१६ च्या हिवाळी परीक्षेत २० हजार ८५८, उन्हाळी-२०१७ मध्ये २३ हजार ७७४, हिवाळी-२०१७ मध्ये २९ हजार ५४४, उन्हाळी-२०१८ मध्ये ३८ हजार ९९६ तर हिवाळी-२०१८ मध्ये ४५ हजार १५९ अर्ज आले. २०१९ च्या उन्हाळी परीक्षांच्या निकालानंतर फेरमूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा ४५ हजार ५०० इतका होता. उन्हाळी-२०१६ च्या तुलनेत उन्हाळी-२०१९ मध्ये फेरमूल्यांकनाच्या अर्जांमध्ये तब्बल ३४ हजार ३८४ म्हणजेच ३०९.३२ टक्क्यांनी वाढ झाली.

तीन कोटींहून अधिकचा महसूल
२०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत विद्यापीठाला फेरमूल्यांकनाच्या माध्यमातून तीन कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. २०१६-१७ मध्ये ४७ लाख ६६ हजार ४०४, २०१७-१८ मध्ये १ कोटी १५ लाख ५३ हजार ६५७ तर २०१८-१९ मध्ये १ कोटी ६६ लाख ९२ हजार ७३७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तीनच वर्षांत महसुलामध्ये १ कोटी १९ लाख २६ हजार ३३३ रुपयांची वाढ झाली. टक्केवारीतील वाढ २५०.२२ टक्के इतकी ठरली.

फेरमूल्यांकनाचे परीक्षानिहाय अर्ज
परीक्षा                     अर्ज
उन्हाळी-२०१६        ११,११६
हिवाळी-२०१६         २०,८५८
उन्हाळी-२०१७        २३,७७४
हिवाळी-२०१७        २९,५४४
उन्हाळी-२०१८        ३८,९९६
हिवाळी-२०१८        ४५,१५९
उन्हाळी-२०१९        ४५,५००

Web Title: Nagpur University: There has been a threefold increase in revaluation applications in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.