नागपूर विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू ! डॉ. मनाली क्षीरसागर यांची कुलपतींकडून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:22 IST2025-12-02T13:21:35+5:302025-12-02T13:22:51+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका (तांत्रिक) व सल्लागार डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे.

Nagpur University gets its first woman Vice Chancellor! Dr. Manali Kshirsagar appointed by the Chancellor
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका (तांत्रिक) व सल्लागार डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी सोमवारी डॉ. क्षीरसागर यांची निवड जाहीर केली. यामुळे नागपूर विद्यापीठाच्या १०२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेला कुलगुरुपदाचा मान मिळाला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुपदासाठी आलेल्या अर्जदारांपैकी २६ जणांच्या प्राथमिक मुलाखती झाल्यानंतर पाच जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डॉ. क्षीरसागर यांच्यासह नागपूर विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या डॉ. स्मिता देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. सतीश पाटील आणि आयआयटी रुरकीचे उदय प्रताप सिंह यांचा समावेश होता. मात्र, दोन महिन्यांपासून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखती रखडलेल्या होत्या. अखेर रविवारी राज्यपाल देवव्रत यांच्यासमोर या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यातील उदय प्रताप सिंह मुलाखतीला गैरहजर होते. पाच उमेदवारांमध्ये डॉ. क्षीरसागर आणि डॉ. कोंडावार यांच्यापैकी एकाची निवड होण्याची दाट शक्यता 'लोकमत'ने वर्तवली होती आणि सोमवारी डॉ. मनाली क्षीरसागर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली. एका स्वतंत्र आदेशादारे राज्यपाल देववत यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. दोन्ही कुलगुरूंच्या नियुक्त्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपर्यंत असतील.
वायसीसीईच्या संचालिका (तांत्रिक) व सल्लागार डॉ. मनाली क्षीरसागर यांनी संगणक विज्ञान विषयात पीएचडी केली असून त्यांनी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणूनही सेवा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात १३ विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. नागपूर विद्यापीठाचा कारभार गेल्या दोन वर्षापासून प्रभारी कुलगुरूंच्या भरवशावर सुरू होता. पूर्वीचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन व अकस्मात निधनानंतर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी कार्यभार सांभाळला. त्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडे प्रभार देण्यात आला. त्या आतापर्यंत हे पद सांभाळत होत्या. डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या नियुक्तीने विद्यापीठाला नियमित कुलगुरू मिळाले आहेत.
कोण आहेत क्षीरसागर?
संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी. पूर्ण केली आहे.
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत त्या गुणवत्ता यादीमध्ये आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात संगणक तंत्रज्ञान पदविकामध्ये त्या गुणवत्ता यादीत दुसऱ्या होत्या.
जर्मनीतील 'टीयूव्ही'च्या प्रमाणित लीड ऑडिटर होत्या.
त्या नागपूरच्या स्थानिक संगणक अभियांत्रिकी केंद्राचे स्थानिक व्यवस्थापकीय सदस्य आहेत.
आयआयआयटी पुणेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित.
नियमित चार अधिष्ठाताही मिळणार
विद्यापीठाच्या नियमित कुलगुरूंना प्र-कुलगुरू यांचे नाव ठरवण्याचा अधिकार असतो. कुलगुरू राज्यपालांकडे त्यांच्या मर्जीतील व्यक्तीचे नाव प्र-कुलगुरुपदासाठी पाठवतात. त्यावर राज्यपाल शिक्कामोर्तब करतात. तर नियमित अधिष्ठातांची निवडही कुलगुरूच करतात. मात्र, डॉ. चौधरी यांचे निलंबन आणि त्यांच्या निधनावर विद्यापीठाला नियमित कुलगुरू नसल्याने सर्वच पद प्रभारींच्या भरवशावर होते. डॉ. क्षीरसागर यांच्या निवडीने आता नियमित प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता मिळणार.