नागपूर विद्यापीठ : अखेर कुलगुरुपदासाठी मागविले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:52 PM2020-03-20T23:52:52+5:302020-03-20T23:55:10+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत.

Nagpur University: Application Form for Vice-Chancellor | नागपूर विद्यापीठ : अखेर कुलगुरुपदासाठी मागविले अर्ज

नागपूर विद्यापीठ : अखेर कुलगुरुपदासाठी मागविले अर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देमे-जून महिन्यातच होणार नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत. २० एप्रिलपर्यंत त्यांना अर्ज करता येणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूणच नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी मे अथवा जून महिनाच उजाडू शकेल अशी शक्यता आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे ६ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत हे विशेष.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठाने नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेच्या संयुक्त समितीने सदस्य म्हणून आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांची निवड केली होती. मात्र, त्यानंतर दोन महिने राज्यपाल कार्यालयाकडून अध्यक्षांची नियुक्ती करण्यात न आल्याने प्रक्रिया थंडबस्त्यात होती. आता यासंबंधात हालचाली सुरू झाल्या असून नागपूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवड समितीच्या अध्यक्षपदी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची तर सदस्य सचिव म्हणून पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर अर्ज मागविण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते.
अखेर निवड समितीने यासंदर्भात जाहिरात काढली आहे. २० एप्रिलपर्यंत इच्छुकांना अर्ज पाठविता येणार आहे. कुलगुरुपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ‘ए-४’ आकाराच्या पेपरमध्ये अर्जाच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत. याशिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रारूपात दोन पानांत उमेदवारीचे औचित्य, ‘व्हिजन स्टेटमेंट’ आणि स्वत:शी संबंधित असलेल्या तीन नामांकित व्यक्तींची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

‘आयआयटी-पवई’चे कुलसचिव ‘नोडल’ अधिकारी
कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्यांना त्यांचे अर्ज मुंबईला पाठवावे लागणार आहेत. निवड समितीने ‘आयआयटी-मुंबई’चे कुलसचिव डॉ. आर. प्रेमकुमार यांना ‘नोडल’ अधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर मग चाळणी प्रक्रिया होईल.

विद्यापीठातूनच अनेक इच्छुक
दरम्यान, कुलगुरुपदासाठी नागपूर विद्यापीठातूनदेखील अनेक इच्छुक आहेत. काही जण तर बऱ्याच काळापासून कुलगुरुपदासाठी प्रयत्नरत आहेत. मागील पाच वर्षांत विविध विद्यापीठांच्या कुलगुरुपदासाठी त्यांनी अर्जदेखील केले. मात्र त्यांची निवड होऊ शकली नाही. आता नागपूर विद्यापीठातच ही संधी मिळावी यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

अशी असेल पुढील प्रक्रिया

  • पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात
  • समितीकडून नियमांनुसार अर्जांची छाननी आणि पात्र उमेदवारांची निवड
  • पात्र उमेदवारांना सादरीकरणाची संधी
  • समितीकडून ५ उमेदवारांच्या नावांची राज्यपालांकडे शिफारस.
  • मुंबईत राज्यपालांकडून या उमेदवारांच्या मुलाखती
  •  अखेरचा निर्णय राज्यपालांचा.
  • यातून कुलगुरुपदासाठी सर्वात योग्य उमेदवाराच्या नावाची घोषणा

 

Web Title: Nagpur University: Application Form for Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.