नागपुरात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने २२ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:53 AM2019-12-13T10:53:24+5:302019-12-13T10:55:51+5:30

सिंगापूरच्या सफरीसाठी निघालेल्या २६ जणांना विमानाच्या बनावट तिकिटा देऊन त्यांची तसेच त्यांच्या सफरीसाठी पुढाकार घेणाऱ्या आयोजकांची टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

In Nagpur, a travel entrepreneur cheated to customer | नागपुरात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने २२ लाखांनी गंडविले

नागपुरात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने २२ लाखांनी गंडविले

Next
ठळक मुद्देविमानाच्या बनावट तिकिटा दिल्या विदेश सफरीसाठी पुढाकार घेणारा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिंगापूरच्या सफरीसाठी निघालेल्या २६ जणांना विमानाच्या बनावट तिकिटा देऊन त्यांची तसेच त्यांच्या सफरीसाठी पुढाकार घेणाऱ्या आयोजकांची टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी एका दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
स्वप्निल अनिल खाडे (वय ३१, रा. बालाजीनगर) हे विदेशी सफरीच्या आयोजनाची सेवा देतात. आरोपी रमेश सर्वरी राजम (रा. माधव व्हिला, नरेंद्रनगर) आणि गौरी रमेश राजम यांच्याशी व्यावसायिक संबंधाने वर्षभरापूर्वी खाडे जुळले. राजम दाम्पत्याचे बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी चौक, एलआयसी कॉलनीतील साई मेन्शनजवळ कार्यालय आहे. जुलै २०१९ मध्ये हरिओम मित्तल यांनी राजम दाम्पत्याला पॅकेज टूर्सकरिता ३ लाख ५७ हजार रुपये दिले. मात्र, त्यांनी ती सफर घडवून आणली नाही. त्यानंतर स्वप्निल खाडे यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये २६ लोकांच्या विमानाच्या तिकिटांकरिता राजम दाम्पत्याच्या खात्यात २ लाख ६७ हजार रुपये जमा केले. आरोपींनी खाडेंना त्या २६ जणांच्या विमानाच्या तिकिटा पाठविल्या. मात्र, त्या विमान प्रवासाच्या तिकिटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्यांच्या या तिकिटा होत्या, त्या मंडळींनी खाडे यांना खरे-खोटे सुनावत आपली रक्कम परत मागितली. त्यानंतर खाडे यांनी पुणे येथील अकबर आॅनलाईन बुकिंग कंपनीचा व्यवस्थापक अनिल कुटे याच्यामार्फत ११ लोकांच्या सिंगापूर सफरीचे आयोजन केले. येथेही आरोपी राजम दाम्पत्याने कुटेंसोबत संगनमत करून ११ लोकांचे पासपोर्ट अडवून (गहाण) ठेवले. या एकूणच प्रकारामुळे खाडे यांचे २२ लाख २८ हजारांनी नुकसान झाले. त्यांनी राजम दाम्पत्य आणि कुटेंना त्यासंबंधाने वारंवार विनंती करून आपली रक्कम परत मागितली. मात्र, आरोपींनी रक्कम परत दिली नाही. त्यामुळे अखेर खाडे यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून बुधवारी आरोपी राजम दाम्पत्य तसेच कुटे या तिघांविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: In Nagpur, a travel entrepreneur cheated to customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.