'Nagmani-2020' Exhibition: Uncover ancient history with rare coins | 'नागमणी-२०२०' प्रदर्शन :  दुर्मिळ नाण्यांमधून प्राचीन इतिहासाचा उलगडा 

'नागमणी-२०२०' प्रदर्शन :  दुर्मिळ नाण्यांमधून प्राचीन इतिहासाचा उलगडा 

ठळक मुद्देशिवरायांची राजमुद्रा, मोघल व इतर राजांच्या नाण्यांची दुर्मिळ ओळख

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नाणी आपल्याला इतिहासातील आर्थिक विनिमय, व्यापार, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर आदी कितीतरी पैलूंविषयीचे बोलके अस्तित्व होय. या भूमीवर कधीकाळी होऊन गेलेले राजे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास या दुर्मिळ नाण्यांमुळे मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या गोष्टी महत्त्वाच्या असतात. शेकडो वर्षांपासून होणाऱ्या विनिमय संबंधाचे दर्शन घडविणारे दुर्मिळ व प्राचीन नाणी आणि नोटांचे प्रदर्शन सध्या नागपूरकरांना आकर्षित करीत आहे.
न्यूमिसमॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने येत्या रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह, मोरभवन येथे दुर्मिळ नाणी आणि नोटांचे ‘नागमणी-२०२०’ हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी तसेच पीयूष अग्रवाल, भरत सरय्या, अनुज सक्सेना, जगदीश अग्रवाल, संजय मिश्रा, जी. सी. नागदेव आदींच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. एकेकाळी देवाणघेवाणीचे आर्थिक चलन म्हणून वापरल्या जाणारी नाणे व नोटा आज कालौघानुसार चलनातून बाद झाल्या आहेत. मात्र त्यांचा प्रदीर्घ इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात दिसून येते. प्रदर्शनात विशेष आकर्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक काळात तयार करण्यात आलेली सुवर्ण मुद्रा ठेवण्यात आली आहे. ही मुद्रा चंद्रपूरचे अशोक सिंह ठाकूर यांनी प्रदर्शित केली असून, काही निवडकच प्रती या सध्या हयात आहेत. त्यापैकी ही एक प्रत आहे. तसेच कमल वैद्य यांच्या १५१ सोन्याच्या मोहरा येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. याशिवाय जेव्हापासून नाणींचा वापर चलनात आला तेव्हापासून ते आजवर वापरात येणाºया सर्वप्रकारची नाणी-नोटा प्रदर्शनात बघायला मिळतात. देशभरातून आलेल्या ९२ विविध छंद जोपासकांचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले आहेत. नोटा व नाणी जमा करण्याचा छंद जोपासणाऱ्यांकरिता ४० हून अधिक नाणी खरेदी-विक्रीचे स्टॉल येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 पंतप्रधानांच्या जन्मदिनाची नोट
प्रदर्शनात राहुल चांडक यांनी लावलेल्या स्टॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंची जन्मतारीख दर्शविणारी १० रुपयांची नोट उपलब्ध आहे. चांडक यांनी ही नोट पंतप्रधान यांना भेट म्हणून पाठविली होती. पंतप्रधान कार्यालयातून दिलगिरी व्यक्त करणारे पत्र त्यांना प्राप्त झाल्याचे ते सांगतात. नोटांप्रती नागरिकांमध्ये जाणीवजागृती व्हावी याकरिता गेल्या १० वर्षांपासून ते कार्य करीत आहेत. विशेष म्हणजे, येथे स्वत:च्या जन्मतारीख किंवा विशेष तारखेची नोट सहज उपलब्ध आहे. याशिवाय आपल्या नावाप्रमाणे असणाऱ्या नोटादेखील येथे तयार करून दिल्या जातात.

Web Title: 'Nagmani-2020' Exhibition: Uncover ancient history with rare coins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.