मनपाच्या सेवा तीन महिन्यात ऑनलाईन : आयुक्त तुकाराम मुंढे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 08:27 PM2020-01-29T20:27:17+5:302020-01-29T20:29:11+5:30

तीन महिन्यात मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी ई-गव्हर्नन्स यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास व पैसा वाचणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

Municipal Services Online in Three Months: Testimony of Commissioner Tukaram Mundhe | मनपाच्या सेवा तीन महिन्यात ऑनलाईन : आयुक्त तुकाराम मुंढे यांची ग्वाही

मनपाच्या सेवा तीन महिन्यात ऑनलाईन : आयुक्त तुकाराम मुंढे यांची ग्वाही

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न : पदाधिकाऱ्यांचा सपोर्ट आवश्यकच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. लहानसहान कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. तीन महिन्यात मनपाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यासाठी ई-गव्हर्नन्स यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास व पैसा वाचणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. दोन दिवसात त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासोबतच बुधवारी त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक व योग्य निर्णय घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
महापालिकेच्या सर्व सेवा मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होतील. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याला फिडबॅक दिला जाईल, अशी ई-गव्हर्नन्स यंत्रणा सक्षम केली जाईल. राहण्यायोग्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार नाही. चांगल्या दर्जाच्या शाळा, नोकरीची संधी, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बगीचे, चांगली शहर बससेवा, अखंडित पाणीपुरवठा, चांगले रस्ते, पथदिवे, सिवरेज अशा सुविधा आवश्यक आहेत, सोबतच महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. यासाठी आर्थिक स्रोत बळकट करण्याचा मानस मुंढे यांनी व्यक्त केला.

लोकल बॉडीचा सपोर्ट आवश्यकच
महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासन या दोघांचेही शहर विकासाच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. विकास कामे व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करताना प्रशासनाला लोकल बॉडीचा सपोर्ट आवश्यकच आहे. आधीच्या आयुक्तांनीही चांगले काम केले आहे. परंतु प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगवेगळी असते. शहर विकासासाठी सर्वांचाच प्रयत्न असतो. त्यामुळे दोघांच्या कामाची तुलना करता येणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

थेट संवादातून फिडबॅक मिळतो
अधिकारी, पदाधिकारी व तक्रारदार यांच्याकडून माहिती मिळते. परंतु यातील वास्तव नागरिकांशी थेट संवाद साधल्यानंतर फिडबॅक मिळतो. म्हणूनच जनता दरबार वा लोकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. यासाठी शहरातील नागरिकांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पन्न बघून खर्च
शहरात मोठमोठी विकास कामे व्हावीत अशी सर्वांची अपेक्षा आहे. परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेऊनच विकास कामासाठी तरतूद करावी लागले. यात आवश्यक सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या विभागाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती मुंढे यांनी दिली.

Web Title: Municipal Services Online in Three Months: Testimony of Commissioner Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.