नागपूर जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित : नाग नदीच्या प्रदूषणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 08:38 PM2019-11-21T20:38:02+5:302019-11-21T20:40:30+5:30

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे नुकत्याच जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता व स्थिती अहवालामध्ये राज्यात संख्येने अधिक नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. या नद्या आणि त्यांचे जलस्रोत सर्वाधिक प्रदूषित आढळल्याची नोंदही प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.

The most polluted of rivers in Nagpur district: increase in pollution of Nag river | नागपूर जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित : नाग नदीच्या प्रदूषणात वाढ

नागपूर जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित : नाग नदीच्या प्रदूषणात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे नुकत्याच जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता व स्थिती अहवालामध्ये राज्यात संख्येने अधिक नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. या नद्या आणि त्यांचे जलस्रोत सर्वाधिक प्रदूषित आढळल्याची नोंदही प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.
महाराष्ट्रात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली असली तरी नागपूर जिल्ह्यातील नद्यांचे अधिक प्रमाण आणि त्याचा जलस्रोत लक्षात घेता प्रदूषण मात्र अधिक आढळले आहे. असे असले तरी २०१७ मधील अहवालाच्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचे अहवालात म्हटल्याने ही थोडी समाधानाची बाजू मानली जात आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील १७६ नद्या आणि समुद्र, धरणे, कूपनलिका, विहिरी असे मिळून २२८ पाणी गुणवत्ता तपासणी केंद्रांच्या माध्यमातून अध्ययन केले. एवढेच नाही तर ६६ भूजल सर्वेक्षण केंद्रांच्या माध्यमातूनही अभ्यास करून हा अहवाल जाहीर केला आहे. या प्रदूषणाच्या आधारावरच मंडळाने महाराष्ट्रातील पाणी प्रदूषण निर्देशांक ठरविला आहे. या सर्वेक्षणात पाण्याचे ४३ मापदंड तपासण्यात आले. त्यानुसार तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली. त्या पाठोपाठ वैनगंगा, वर्धा, प्राणहिता या नद्याही प्रदूषित आढळल्या आहेत.
या सर्वेक्षणामध्ये नागपूर जिल्ह्यातील बहुतेक नद्या आणि जलस्रोत प्रदूषित आढळले आहेत. नागपूर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता बहुतेक नद्या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेला मिळत असल्याने या नदीचे पाणीही प्रदूषित असल्याची नोंद या अहवालामध्ये घेण्यात आली आहे.

सर्वच गोदावरीच्या उपनद्या
नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या बहुतेक सर्वच नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. नाग, पेंच, वैनगंगा, पिली, चंद्रभागा, सूर, कन्हान, आम, कोलार, वर्धा, बोर, जाम, वेणा यासह मरू, जीवना, सांड, मदार, नांद या नद्यांचा उल्लेख प्रामुख्याने होतो. यातील जाम नदी वर्धा नदीला मिळते तर वर्धा ही गोदावरीला मिळते. अन्य बहुतेक नद्या वैनगंगेला मिळतात तर वैनगंगा हीसुद्धा पुढे गोदावरीलाच मिळते.

जलप्रदूषणाचा असा आहे विळखा
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी आणि पिली नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. नागपूरची ओळख असलेली नाग नदी आता सांडपाणी वाहून जाणारी नदी झाली आहे. या दोन्ही नद्या वैनगंगेला मिळतात. हिंगणा तालुक्यातील वेणा आणि कृष्णा या नद्यांमधून हिंगणा, वानाडोंगरी येथील सांडपाणी नाल्यांवाटे सोडले जाते. या सोबतच बुटीबोरी औद्योगिक वसाहतीचे पाणीही याच नद्यांमध्ये सोडले जाते. सावनेर तालुक्यातून वाहणाºया कोलार आणि कन्हान या वैनगंगेच्या उपनद्या आहेत. या नद्यांमध्ये वीज प्रकल्पातील फ्लाय अ‍ॅश आणि सिव्हरेज वॉटर सोडले जाणे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. सूर नदीमध्ये मौदातील सांडपाणी सोडले जाते. या सोबतच कंपन्यांचे रसायनयुक्त पाणीही सोडण्यात येते. मोहपा शहरातून वाहणारी मधुगंगा एके काळी अत्यंत प्रदूषित होती. आता त्यात बरीच सुधारणा झाली आहे. ही नदी चंद्रभागेला व चंद्रभागा पुढे वैनगंगेला मिळते. सावनेर तालुक्यातील बोरगाव वेकोलितील काळे पाणी नाल्यामार्गे कोलार नदीत सोडले जाते. कोलार नदी वैनगंगेला मिळते. जाम नदीमध्ये काटोलमधील सांडपाणी पोहचते. ही नदी पुढे वैनगंगेला मिळते. हे सर्व पाणी वैनगंगेत पोहचत असल्याने तिचाही जलस्तर प्रदूषित झाला आहे.

Web Title: The most polluted of rivers in Nagpur district: increase in pollution of Nag river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.