मानवी चुकांमुळेच सर्वाधिक अपघात; नागपुरातील धक्कादायक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:01 AM2020-02-19T11:01:27+5:302020-02-19T11:01:48+5:30

एकट्या नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले.

Most accidents due to human error; Shocking reality in Nagpur | मानवी चुकांमुळेच सर्वाधिक अपघात; नागपुरातील धक्कादायक वास्तव

मानवी चुकांमुळेच सर्वाधिक अपघात; नागपुरातील धक्कादायक वास्तव

Next
ठळक मुद्दे४५ दिवसात ३७ अपघात, ३९ मृत्यू 



 

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे शहरातील चित्र आहे. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या ४५ दिवसात ३७ अपघात झाले असून यात ३९ जणांचे बळी गेले आहेत. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे समोर आले आहे. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. वाहतूक नियमांच्या व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरावस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. मर्यादित पार्किंगच्या जागा व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) कार्यालयाने ४५ दिवसात शहरात झालेले रस्ता अपघात व मृत्यूचा अभ्यास केला असता हे अपघात ९ ते सकाळी ७ दरम्यान झाल्याचे पुढे आले आहे. या वेळेत रस्ता मोकळा म्हणजे अनियंत्रित वेग व वाहतूक नियमांची पायमल्ली हे अपघातासाठी तर सुरक्षिततेविषयी निष्काळजीपणा हे मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. झालेल्या ३७ अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.
जिल्ह्यात २०१८ मध्ये अपघातात ५७७ तर २०१९ मध्ये ६३४ मृत्यू
एकट्या नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. एकूण जिल्ह्यात २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. एकूण जिल्ह्यात १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असलेतरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

वेगाने वाहन चालविणे हे अपघाताचे कारण
वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणायाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते.

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर का?
दुचाकीचा अपघात होऊन आपले डोके एखाद्या कठीण पृष्ठभागावर आदळते, तेव्हा अगदी सेकंदभरात डोके काम करेनासे होते. ताशी १० ते १०० कि.मी. वेगाने मोटारबाईक चालविणाऱ्याला होणाऱ्या अपघातात ही प्रक्रिया हानिकारक ठरते.
२० कि.मी. वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होतो, तेव्हा निर्माण होणारा आघात ५०००० न्यूटन मापाच्या बलाइतका प्रचंड असतो. या आघाताने कवटीला चिरा जाणे, मेंदूत रक्तस्राव, मेंदूला धक्का, मुका मार; अशा इजा होतात. अशावेळी डोक्यावर असलेले हेल्मेट हा आघात शोषून डोक्याचे रक्षण करते.

अपघात निश्चितच टाळता येण्यासारखे
अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. प्रवासादरम्यानची जीवित सुरक्षितता प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतु अधिक गतीने वाहन चालविणे, चालविताना वाहतुकीचे नियम तोडणे हल्ली फॅशन झाली आहे. ही फॅशन वाहनचालकासोबतच पादचारी व निरपराध व्यक्तीच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोषी चालकांवर कारवाई केली जात आहे, सोबतच चालक व सामान्य व्यक्तींमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.
-चिन्मय पंडित, पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

Web Title: Most accidents due to human error; Shocking reality in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात