मनोरुग्णांना हवाय नातेवाईकांचा जिव्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:44 PM2018-10-16T16:44:10+5:302018-10-16T16:47:08+5:30

राज्यातील चारही प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक कक्ष म्हणजे ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील तीन रुग्णालयात हा वॉर्ड सुरू झाला मात्र, नागपूर मनोरुग्णालयात अद्यापही याची प्रतीक्षा आहे.

Mental patients needs family support | मनोरुग्णांना हवाय नातेवाईकांचा जिव्हाळा

मनोरुग्णांना हवाय नातेवाईकांचा जिव्हाळा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालयकौटुंबिक कक्ष अद्यापही ‘कल्पनेत’च

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनोरुग्णांना औषधोपचारासोबतच नातेवाईकांच्या जिव्हाळ्याची मायेची ऊब मिळाल्यास तो लवकर बरा होतो. याच संकल्पनेतून राज्यातील चारही प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक कक्ष म्हणजे ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी याचे उद्घाटन करण्याचे निर्देशही देण्यात आले. राज्यातील तीन रुग्णालयात हा वॉर्ड सुरू झाला मात्र, नागपूर मनोरुग्णालयात अद्यापही याची प्रतीक्षा आहे. मनोरुग्णांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत अधिकारी गंभीर नसल्याचे यातून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मनावरही होऊ लागला आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मनोविकाराच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. यात पुरुषांसोबतच महिलांची संख्या अधिक असून स्क्रि झोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मनोरुग्णालयात ५००च्या वर स्त्री व पुरुष रुग्ण वॉर्डात उपचार घेत आहेत. परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकार तज्ज्ञांची साथ मोलाची. मात्र, डॉक्टरांपासून ते अटेन्डट यांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांवर याचा परिणाम होत आहे. दुसरीकडे मनोरुग्णांना गोळ्या औषधांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या सहवासाची गरज असते. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा येऊ शकतात. पूर्वीप्रमाणे दैनंदिन जीवन जगू शकतात. त्यासाठी ‘फॅमिली वॉर्ड’ ही संकल्पना पुढे आली. आरोग्य विभागाने या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील चारही प्रादेशिक मनोरुग्णालयाला हा ‘वॉर्ड’ २ आॅक्टोबर रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील वॉर्ड क्र ९ व १०चे नूतनीकरण करून ‘फॅमिली वॉर्डाचे स्वरूप दिले जाणार होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या दुर्लक्षितपणामुळे या वॉर्डाच्या नूतनीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी दुसऱ्या वॉर्डात हा वॉर्ड सुरू केला जाऊ शकत होता, परंतु रुग्णालय प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कौटुंबिक कक्ष कधी सुरू होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर राज्यातील पुणे, ठाणे, रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात हा कक्ष सुरूही झाला आहे. यातील ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील कौटुंबिक कक्षाचे उद्घाटन स्वत: आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी केले आहे.

अशी होती संकल्पना
मनोरुग्णालयात कौटुंबिक कक्षांची उभारणी करून तेथे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक राहू शकतील, अशी व्यवस्था करणे. येथे घराप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, नातेवाईकांनी स्वत: स्वयंपाक करून रुग्णांना खाऊ घालणे, त्यामुळे नियमित उपचाराबरोबरच नातेवाईकांच्या सहवासामुळे रुग्ण लवकर बरे होऊ शकतील, अशी या कक्षामागील संकल्पना होती.

कक्षाबाबत खोटे कोण बोलते?
या वृत्ताच्या संदर्भात नागपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र पातुरकर यांना विचारणा केली असता, सुरुवातीला त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. नंतर त्यांनी रुग्णालयात हा कक्ष सुरू झाल्याचे सांगितले. परंतु त्याचवेळी रुग्णालयातील दूरध्वनी क्रमांकावर याबाबत विचारले असता तेथील कर्मचाऱ्याने हा कक्ष सुरूच झाला नसल्याचे सांगितले. यामुळे खोटे कोण बोलते, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Mental patients needs family support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.