मेडिकल : एमआरआयच्या अभावाचे रुग्णांसाठी नवे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:57 PM2020-10-16T22:57:09+5:302020-10-16T23:00:26+5:30

Government Medical College, MRI आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेडिकलची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांना आधार वाटते. मात्र ‘एमआरआय’ सारख्या अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णांसाठी नवे दुखणे ठरत आहे.

Medical: New pain for patients lacking MRI | मेडिकल : एमआरआयच्या अभावाचे रुग्णांसाठी नवे दुखणे

मेडिकल : एमआरआयच्या अभावाचे रुग्णांसाठी नवे दुखणे

Next
ठळक मुद्देयंत्राची खरेदी प्रक्रिया रखडली : गरीब रुग्ण अडचणीत

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेडिकलची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांना आधार वाटते. मात्र ‘एमआरआय’ सारख्या अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णांसाठी नवे दुखणे ठरत आहे. विशेष म्हणजे, मार्च २०१८ मध्ये कालबाह्य झालेले हे यंत्र डिसेंबर २०१९ मध्ये भंगारात काढले, त्यापूर्वी मेडिकल प्रशासनाने नव्या यंत्राच्या खरेदीसाठी खनिकर्म विभागातून १६ कोटी रुपये खेचून आणले. हा निधी हाफकिन्स कंपनीकडे जमाही केला. परंतु अद्यापही खरेदी प्रक्रिया रखडलेलीच आहे. रुग्णांना मेयोला पाठविले जाते, मात्र दिवसभरात तिथे सहावर एमआरआय होत नसल्याने गरिबांचा जीव धोक्यात आला आहे.

आजची उपचार पद्धती ही तंत्रावर ठरत असताना ‘एमआरआय’ यंत्राच्या बाबतीत मात्र मेडिकल पिछाडीवर पडले आहे. रोगाचे अचूक निदान करताना अडथळे येत आहेत. सुमारे २००८ मध्ये मेडिकलला एमआरआय उपलब्ध झाले. विदर्भात हे एकमेव यंत्र होते. मेयोमध्येही एमआरआय नसल्याने या यंत्रावर रुग्णांचा मोठा भार होता. दहा वर्षानंतर एमआरआयची कालमर्यादा संपली. संबंधित कंपनीसोबत असलेले देखभालीचा कार्यकाळही संपला. यातच वारंवार एमआरआय नादुरुस्त राहू लागल्याने त्यावर मोठा खर्च होऊ लागला. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने नवे एमआरआय यंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म विभागातून १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मेडिकल प्रशासनाने यंत्र खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिन कंपनीकडे हा निधी वळता केला. यंत्र खरेदीसाठी निविदा निघाली. परंतु नंतर काही कारणाने ही प्रक्रिया रखडली. दरम्यान कोविडमुळे लॉकडाऊन सुरू झाले. ऑगस्ट महिन्यापासून मेडिकल प्रशासन खरेदी प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तांत्रिक अडचणीत येत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. सध्या कोविडचे रुग्ण कमी व नॉनकोविडचे रुग्ण वाढले आहे. यामुळे ‘एमआरआय’ची मोठी गरज रुग्णालय प्रशासनासाठी अडचणीचे ठरत आहे.

मेयोमध्ये रोज सहावर एमआरआय नाही

मेयोमध्ये जेव्हा एमआरआय नव्हते तेव्हा येथील रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जायचे. रोज २५ वर एमआरआय व्हायचे. परंतु आता मेडिकलचे यंत्र बंद असल्याने येथील रुग्ण मेयोमध्ये पाठविले जातात. सूत्रानूसार, दुपारी ४ वाजता नंतर एमआरआय केला जात नाही. दिवसाकाठी केवळ सहाच रुग्णांचे एमआरआय केले जाते. यामुळे गंभीर किंवा अपघाताचे रुग्णांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महिन्याभरात खरेदी प्रक्रिया पूर्ण होणार

लॉकडाऊनमुळे एमआरआयची निविदा प्रक्रिया रखडली होती. परंतु ऑगस्ट महिन्यापासून ती पुन्हा सुरू झाली. साधारण महिन्याभरात खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. रुग्णसेवा अडचणीत येऊ नये म्हणून, मेयोची अपॉईटमेन्ट घेऊन रुग्ण पाठविले जातात. त्यांच्या मदतीला मेडिकलचे विद्यार्थीही पाठविले जातात.

डॉ. आरती आनंद

प्रमुख, रेडिओलॉजी विभाग

Web Title: Medical: New pain for patients lacking MRI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.