मेडिकल : कोविडच्या ४०० खाटा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:20 AM2020-09-30T00:20:03+5:302020-09-30T00:21:29+5:30

मेडिकलच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोविडच्या १००० खाटांच्या निर्देशानंतर मेडिकलने पुढाकार घेतला आहे.

Medical: Covid's 400 beds will increase | मेडिकल : कोविडच्या ४०० खाटा वाढणार

मेडिकल : कोविडच्या ४०० खाटा वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोविडच्या १००० खाटांच्या निर्देशानंतर मेडिकलने पुढाकार घेतला आहे. सोमवारी डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाढीव खाटांचा जागेपासून ते यंत्रसामग्री, औषधे, मनुष्यबळ आदींचा विस्तृत अहवाल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे सादर केला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मेडिकलला भेट दिली. या वेळी त्यांनी बैठकीत १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असण्यावर नाराजी व्यक्त केली. कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांच्या सुटीवर, अनेक वरिष्ठ डॉक्टर कोविड रुग्णसेवेत नसल्याबद्दल व इतरही गैरसोयींवर आक्षेप घेतला. याची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी घेतली. त्यांनी कोविडच्या ४०० खाटा वाढविण्यासाठी डॉ. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कोविड समिती स्थापन केली. यात डॉ. राजेश गोसावी, डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. बारसागडे, डॉ. दीप्ती जैन यांच्यासह डॉ. मो. फौजल, डॉ. ब्रिजेश गुप्ता व मेट्रन तायडे यांचाही समावेश करण्यात आला.

४०० खाटांचे ‘एचडीयू’
डॉ. गुप्ता यांनी सांगितले, वाढीव ४०० खाटा या ‘एचडीयू’ असणार. मेडिकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील १० वॉर्ड यासाठी रिकामे केले जातील. यात ७ ते ११, १४ व १७ ते २० वॉर्डाचा समावेश असेल. प्रत्येक वॉर्ड ४० खाटांचा असेल. यासाठी २०० डॉक्टर, २०० परिचारिका व १०० कर्मचाऱ्यांसह आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा अहवाल सादर केला आहे.

१९ कोटींचा प्रस्ताव
मेडिकलमध्ये कोविडचा वाढीव ४०० खाटांसाठी १९ कोटींचा प्रस्ताव समितीने तयार केला आहे. यात मनुष्यबळ, यंत्रसामग्री व औषधांचा समावेश आहे. वॉर्ड रिकामे करण्यापासून ते ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल.
डॉ. सुधीर गुप्ता
अध्यक्ष, मेडिकल कोविड समिती

Web Title: Medical: Covid's 400 beds will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.