झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये! लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:24 AM2020-11-13T11:24:21+5:302020-11-13T11:24:42+5:30

Diwali Flowers Nagpur News नागपूरच्या बाजारात झेंडू, शेवंती आणि देशी गुलाबाची जवळपास ५० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली असून सकाळी झेंडू १०० ते १५० रुपये आणि शेवंती फुलाचे भाव २५० ते ३०० रुपये किलो होते.

Marigold 100, Shevanti 250, Rose 300 rupees! Lakshmi Puja prices will go up | झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये! लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार

झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये! लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्देपूजा व सजावटीच्या फुलांची आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दसरा ते दिवाळीपर्यंत पूजेच्या फूलांना जास्त मागणी असते. दसऱ्याला आणि दिवाळीत तीन दिवस फुलांची जास्त विक्री होते. त्यानुसार सीताबर्डी, नेताजी मार्केटमधील ठोक बाजारात नागपूर जिल्हा आणि राज्याच्या अन्य भागातून पूजेची आणि सजावटीच्या फूलांची आवक वाढली आहे. गुरुवारी झेंडू, शेवंती आणि देशी गुलाबाची जवळपास ५० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली असून सकाळी झेंडू १०० ते १५० रुपये आणि शेवंती फुलाचे भाव २५० ते ३०० रुपये किलो होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाववाढीची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

नेताजी मार्केट ठोक फूल बाजाराचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, फुलांची सर्वाधिक विक्री दिवाळीच्या तीन दिवसात होते. गेल्या महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना फुलाचे चांगले पीक झाले आहे. कोरोनानंतर दसरा आणि दिवाळीत फुलांना मागणी असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत. बुधवारी २० गाड्यांची आवक झाली, तर गुरुवारी आवक दुपटीपेक्षा जास्त होती. सकाळी झेंडूचे भाव १०० रुपये होते, नंतर १५० रुपये किलोपर्यंत पोहोचले. याशिवाय शेवंती २५० रुपये तर नंतर ३०० रुपये किलोवर भाव गेले. झेंडूमध्ये लोकल, कोलकाता, नवरंग माल येत आहे. याशिवाय देशी गुलाब आणि डिवाईन गुलाबाचे भाव ३०० ते ४०० रुपये किलो होते. थंडीमुळे निशिगंधा फुलांची आवक कमी असल्याने भाव ५०० रुपये किलो होते. याशिवाय कुंदा फुलांच्या माळा (जास्मीन प्रकार, सोबत गुलाब) किलोनुसार ५०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव आहेत. तसे पाहता दसऱ्यापेक्षा दिवाळीत फुलांची मागणी कमी असते. केवळ घर सजावट आणि पूजेसाठी फुले लागतात. व्यापारी पंचमीला पूजा करीत असल्याने त्या दिवशी मागणी वाढते. सर्व फ्रेश माल येत आहे.

फुलांची आवक नागपूर जिल्ह्याच्या ७० ते ८० किमी परिसरातून होत आहे. याशिवाय बेंगळुरू, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथून १२ ते १५ गाड्यांची (एक गाडी ३ ते ४ टन) आवक आहे. या तुलनेत स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात येत आहे. दिवाळीच्या दिवसात चोहोबाजूने फुलांची आवक होत असल्याचे रणनवरे यांनी सांगितले. बाजारात आवक वाढल्याने आणि भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळ शेतकरी आनंदी आहेत. कोरोना काळात झालेली नुकसान भरपाई दिवाळीत थोडीफार भरून निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

बाजारात ग्राहकांची गर्दी

फूल बाजारात किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यानुसार दुकानदारही कोरोना नियमांचे पालन करीत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. पण किरकोळ विक्रेते आणि ग्राहक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. दुकानदार सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. दिवाळीच्या दिवसात मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाजाराचा फेरफटका मारून पाहणी करावी, त्यामुळे ग्राहकांवर नियंत्रण येईल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Marigold 100, Shevanti 250, Rose 300 rupees! Lakshmi Puja prices will go up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी