Make Document of folk art, literature: Aruna Dhere | लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे
लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे

ठळक मुद्देसाहित्यिकांनी आपली प्रतिष्ठा वाढवावीद्विदिवसीय मराठी संशोधन साहित्य संमेलनास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैदिकांसोबतच अवैदिक साहित्य, कलांची परंपरा प्राकृत भाषेच्या आश्रयाने सुरूच राहिली आहे. मात्र, त्या मौखिक असल्याने त्यांचा वसा जसाच्या तसा पुढे जाऊ शकला नाही. लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित ‘लोकसाहित्य आणि ललित साहित्य’ या विषयावरील द्विदिवसीय राष्ट्रीय मराठी संशोधन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ढेरे बोलत होत्या. व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रख्यात ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. म.रा. जोशी, सावित्रीबाई फुले विपद्यापीठ पुणे येथील म. फुले अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. गो.ब. देगलूरकर, डॉ. राजेंद्र वाटाणे उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आपण लिहितो, तेव्हा मागचं सगळं ज्ञान तिथपर्यंत येऊन थांबलेलं असतं. संस्कृती ही माणसांनीच घडविली असते. त्यामुळे सोन्यासोबतच माती आणि चांगल्यासोबतच वाईटही आलेले असते. संशोधनाद्वारे त्यांचा अन्वय लावावा लागतो. समकालिनी विचारधन घेऊन पुढे जावं लागतं आणि नव्या संस्कृतीत सहभागी व्हावं लागतं. त्याच संचितातील सामर्थ्याचं दृष्टिकोन ठेवण्याची जबाबदारी संशोधक आणि साहित्यिकांची आहे. मात्र, साहित्यिकांकडील शब्द सामर्थ्य रसातळाला गेल्याने, त्यांचा दर्जा प्रभावहीन झाल्याची भावना डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले, तर आभार डॉ. व्यंकटेश पोटफोडे यांनी मानले.

देगलूरकर यांना ‘संशोधन महर्षी पदवी’
विदर्भ संशोधन मंडळातर्फे या संमेलनात प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांना ‘संशोधन महर्षी पदवी’ प्रदान करण्यात आली. यासोबतच डॉ. म.रा. जोशी यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना देगलूरकर यांनी पुराव्याशिवायचा दावा इतिहासाला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. विदर्भात अनेक वर्षे राहिलो आणि उत्खननातून अनेक गोष्टी बाहेर काढल्या. त्या गोष्टी भविष्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तोंडदेखलेपणाचा गौरव कशासाठी - विश्वनाथ शिंदे
ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे काम वाढत असल्याचे पाहून सनातन यांनी तत्कालीन शुद्रांच्या लोकगीत, साहित्य आणि परंपरांचा गौरव करण्याचा विडा उचलला, मात्र त्यांना सन्मान आजही दिलेला नाही. केवळ तोंडदेखलेपणासाठीचा हा गौरव कशासाठी, असा सवाल डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकसाहित्यावरच नवसाहित्य समृद्ध होत आहे - मदन कुळकर्णी
जुन्या लोकसाहित्य, गीत, परंपरांचे अनुकरण करीतच नवसाहित्य समृद्ध होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानसिक पटलावरील मूलबंध कायम असतात, हे सिद्ध होत असल्याचे डॉ. मदन कुळकर्णी यांनी स्पष्ट केले. मूलभूत साधनांचे एकत्रीकरण व त्यांचा उपयोग करून ललित साहित्याची निर्मिती या सूत्रातून लोकसाहित्याचे जतन करणे सोपे जाणार असल्याचेही कुळकर्णी म्हणाले.

Web Title: Make Document of folk art, literature: Aruna Dhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.