वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात महावितरण आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 08:01 PM2019-11-06T20:01:31+5:302019-11-06T20:03:24+5:30

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. याला गांभीर्याने घेऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.

Mahavitran aggressive against beating power workers | वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात महावितरण आक्रमक

तुळशीबाग येथील कर्मचाऱ्यांची विचारपूस करताना प्रादेशिक संचालक दिलीप घुगल

Next
ठळक मुद्देकठोर पोलीस कारवाईचा आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. याला गांभीर्याने घेऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. अशा घटनांत आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे, हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण कर्मचारी ऊन, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भादंविचे कलम ३५३ या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.
वीज कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ‘वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा या मोफत वापरण्यासाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.
कर्मचारी काम तरी कसे करणार?
महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे, हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे?' असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत.
कठोर दंडाची तरतूद
वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºयाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची विनंती महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली असून, कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद असून, कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकित हल्ल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे.

 

Web Title: Mahavitran aggressive against beating power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.