Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:25 PM2019-10-15T23:25:01+5:302019-10-15T23:26:45+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Ground report: Chief Minister's 'grand hat-trick' difficult to prevent | Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण

Next
ठळक मुद्देनव्या उमेदवारामुळे कॉंग्रेसची दमछाक : बसप, वंचित बहुजन आघाडीचेदेखील आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे. तर कॉंग्रेसकडे तुलनेने नवीन उमेदवार असल्यामुळे मतदारांची नस शोधताना त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. बसप व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारालादेखील प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
२००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस हेच येथून उमेदवार आहेत. त्यांची ही पाचवी निवडणूक राहणार आहे. दोन वेळा ते पश्चिम नागपुरातून निवडून आले होते व २००९, २०१४ मध्ये दक्षिण-पश्चिममधून त्यांनी विजय मिळविला. मागील निवडणुकीत तर ५८ हजारांहून अधिक मतांनी विजयी होत नागपूर शहरातून आतापर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. २०१४ सालापासून पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनीदेखील कामाचा व्याप असतानादेखील या मतदारसंघाकडे जातीने लक्ष ठेवले. शिवाय स्थानिक भाजप नेत्यांकडे येथील मतदारांशी कायम संपर्क साधण्याची जबाबदारी होतीच. त्यामुळे मतदारांशी भाजपचे ‘कनेक्ट’ कायम राहिला. भाजपची येथे परंपरागत ‘व्होटबँक’ असून नवीन मतदारदेखील मोठ्या प्रमाणात जुळले आहेत. प्रचारादरम्यान दररोज सकाळी निघणाऱ्या पदयात्रांमध्ये याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. शिवाय ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून प्रचाराची समांतर यंत्रणा उभारण्यात आली असून मतदारांशी निरंतर संवाद साधण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत भाजपने राबविलेल्या बूथप्रमुख, पेजप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघात संघटन मजबुतीवर भर देण्यात आला होता. त्याचा फायदा भाजपला आता होत असून प्रचाराची ‘ब्ल्यू प्रिंट’ फार अगोदर तयार करण्यात आली होती.
दुसरीकडे कॉंग्रेसचे डॉ.आशिष देशमुख हे मतदारसंघासाठी नवीनच उमेदवार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित झाला नव्हता. ही बाब कॉंग्रेससाठी प्रतिकूल ठरली आहे. प्रफुल्ल गुडधे, रेखा बारहाते यांचे नाव समोर येत होते. या मतदारसंघातून कुणीही लढण्यासाठी तयार नसताना देशमुख यांनी हिंमत दाखविली.
त्यांनी या अगोदर वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि २०१४ मध्ये काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर भाजप नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दक्षिण-पश्चिम नागपुरात त्यांचा म्हणावा असा हक्काचा मतदार कमी आहे. कॉंग्रेसची परंपरागत मतं येथे निश्चित आहे. मात्र अंतर्गत गटबाजीचे ग्रहण अजून सरलेले नाही. मतदारसंघ नवीन असल्यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करताना आशिष देशमुख यांची दमछाक होत आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे कॉंग्रेसची यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्यामुळेच काही प्रचारसभांमध्ये तर त्यांना स्वत: किल्ला लढवावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. अखेरच्या टप्प्यात मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
या मतदारसंघातून बसपचे विवेक हाडके हे उभे आहेत. मागील निवडणुकीत बसपला येथून तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. हाडके हे या मतदारसंघातीलच असून त्यांच्या प्रचारात गर्दी दिसून येत आहे. तर वंचित बहुजन आघाडीतर्फे शहराध्यक्ष रवींद्र शेंडे हे उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभा घेऊन वातावरणनिर्मिती केली. या दोन्ही उमेदवारांच्या मतांचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघातून सर्वाधिक २० उमेदवार उभे आहेत. यात अपक्षांचादेखील भरणा आहे. आता प्रचाराचा अखेरच्या दिवसांत सर्वच जण पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. अशा स्थितीत मतदार कुणावर विश्वास टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Ground report: Chief Minister's 'grand hat-trick' difficult to prevent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.