Maharashtra Assembly Election 2019 : उपराजधानीत महायुतीला फडणवीस-गडकरी यांच्या कामाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:54 PM2019-10-16T22:54:29+5:302019-10-16T22:54:54+5:30

मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासाची कामे जनतेत पोहोचविण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात महायुतीच्या प्रचाराला या दोन्ही नेत्यांच्या नियोजनाचे बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Fadnavis-Gadkari's work strengthened in the sub-continent | Maharashtra Assembly Election 2019 : उपराजधानीत महायुतीला फडणवीस-गडकरी यांच्या कामाचे बळ

Maharashtra Assembly Election 2019 : उपराजधानीत महायुतीला फडणवीस-गडकरी यांच्या कामाचे बळ

Next
ठळक मुद्देशहरातील प्रचारात विकास व ‘व्हिजन’वरच भर : पाच वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात जागतिक नकाशावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शहरातील सर्व जागा मागील पाच वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपचे शहरात वर्चस्व कायम रहावे यासाठी पक्षातर्फे संघटन मजबुतीच्या माध्यमातून ‘मायक्रो प्लॅनिंग’वर भर देण्यात आला. आता मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासाची कामे जनतेत पोहोचविण्यात येत आहेत. यातही पायाभूत सुविधांचा विकास, मेट्रो व राष्ट्रीय पातळीवर शिक्षण संस्थांची स्थापना या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. संपूर्ण शहरात महायुतीच्या प्रचाराला या दोन्ही नेत्यांच्या नियोजनाचे बळ मिळत असल्याचे चित्र आहे.
नागपुरातील सहाही जागांवर महायुतीचा प्रचार सुरू आहे. परंतु भाजपसाठी हा प्रचार मागील तीन वर्षांतील विविध उपक्रमांमधील साखळीचाच एक भाग ठरत आहे. मुख्यमंत्री असतानादेखील फडणवीस यांनी संघटन बळकटीसाठी काय करायला हवे याकडे बारीक लक्ष ठेवले होते. त्यातूनच राज्यात ‘बूथप्रमुख’, ‘पेजप्रमुख’ या योजना प्रभावीपणे राबविण्यात भाजपला यश आले. गडकरी यांच्या मार्गदर्शनातून सरकारच्या योजना नियमितपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत होत्या.
निवडणुका काही दिवसांवर आल्या असतानादेखील प्रचारात मुख्यमंत्री व गडकरी यांच्या नियोजनाचीच छाप दिसून येत आहे. इतर कुठल्याही मुद्द्यांपेक्षा केवळ विकासावरच भर देण्यात येत आहे. या दोन्ही नेत्यांनी २०१४ सालापासून शहरात विविध योजना, गुंतवणूक, प्रकल्प समन्वय व पाठपुराव्याच्या माध्यमातून अक्षरश: खेचून आणले. मागील पाच वर्षांत नागपुरात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, ‘आयआयएम’, ‘एम्स’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘ट्रीपल आयटी’, सिम्बॉयसिस यासारख्या नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आल्या. ‘मिहान’मध्ये बहुराष्ट्रीय ‘आयटी’ कंपन्यांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष आर्थिक क्षेत्रात ५ हजार कोटींची तर विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर ८ हजार कोटींची गुंतवणूक आली. औषधी फार्मा, अन्नप्रक्रिया उद्योगांचीदेखील सुरुवात झाली. याशिवाय ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून नागपूरकडे पाहिले जात आहे.
दुसरीकडे पायाभूत सुविधांचा वेगाने विकास झाला. यात ‘मेट्रो’, सिमेंट रस्ते यांचा प्रामुख्याने समावेश आहे. झोपडपट्टीवासीय अनेक वर्षांपासून मालकी हक्काच्या प्रतीक्षेत होते. त्यांना मालकी हक्क पट्टे वाटपाला सुरुवात झाली. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत शहरात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले व स्मार्ट घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पदेखील राबविण्यात येत आहे. याच सर्व मुद्द्यांना घेऊन भाजप-सेना महायुतीचे लोक जनतेमध्ये जाताना दिसून येत आहेत.
 

‘सोशल मीडिया’वर विशेष कल
भाजपच्या ‘आयटी सेल’तर्फे ‘सोशल मीडिया’च्या प्रचारावरदेखील भर देण्यात येत आहे. प्रचाराच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसनितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये झालेला विकासच आहे. सर्व सहाही मतदारसंघनिहाय प्रचाराचे ‘ई’ साहित्य मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री व गडकरी राज्यभरात प्रचारात व्यस्त असले तरी ते आवर्जून शहरातील प्रचार व इतर बाबींची नियमित माहितीदेखील घेत आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Fadnavis-Gadkari's work strengthened in the sub-continent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.