Maharashtra Assembly Election 2019 : दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी स्वयंसेवकांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 10:08 PM2019-10-09T22:08:57+5:302019-10-09T22:11:58+5:30

नागपूर जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, हे विशेष.

Maharashtra Assembly Election 2019: Appointment of volunteers for the handicapped and senior voters | Maharashtra Assembly Election 2019 : दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी स्वयंसेवकांची नेमणूक

पत्रपरिषदेत माहिती देतांना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, सायबर सेलच्या नोडल अधिकारी उपायुक्त श्वेता खेडकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा

Next
ठळक मुद्देब्रेन लिपीत व्होटर स्लीप : जिल्ह्यात १२,०७८ दिव्यांग मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग, अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा व विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, हे विशेष.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती जर अंध किंवा एखाद्या तीव्र शारीरिक व्याधींनी ग्रस्त असेल आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील चिन्ह ओळखण्यास सक्षम नसेल, अशा परिस्थितीत मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने सहायक मदत करु शकतो. नागपूर जिल्ह्यात सध्या १२ हजार ८७ दिव्यांग व्यक्तींची नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आणि ऑनलाईन अ‍ॅपद्वारे नोंदणी झाली आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा व्यक्तींना रांगेत प्रतीक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच मतदान केंदावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, ब्रेल लिपितील मतदार स्लिप, डमी मतदान पत्र (बॅलेट पेपर), मॅग्नीफाईंग ग्लास, मॅग्नीफाईंग शिट इत्यादी साहित्य, दर्शक संकेत चिन्ह, मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक, अपंग शाळेतील कर्मचारी, शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.
महिनाभरात आठ हजारावर मतदार वाढले
निवडणूक विभागाने राबवलेल्या विशेष नोंदणी अभियानात महिन्याभरातच नागपुरात ८०५६ इतक्या नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे नागपूरची मतदार संख्या आता ४१,७१,४२० इतकी झाली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
यापूर्वी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात नागपूरची एकूण मतदार संख्या ४१,६३,३६७ इतकी होती. यात आणखी ८ हजार मतदारांची भर पडली अहे. नागपूर पश्चिममध्ये १४५५ तर कामठीमध्ये १४५८ इतकी सर्वाधिक नवीन नोंदणी करण्यात आली. यानंतर नागपूर पूर्व १०११, नागपूर उत्तर ९३१, हिंगणा ७१२, नागपूर दक्षिण-पश्चिम ७०७, नागपूर दक्षिण ५९१, काटोल ३७५, उमरेड २५४, रामटेक २१०, नागपूर मध्य २०१, आणि सावनेर १४८ नवीन मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे तृतीयपंथी मतदारांची संख्या एक ने कमी झाली आहे. पूर्वी १०० तृतीयपंथी मतदार होते ते आता ९९ राहिले आहेत.
एकूण मतदार : ४१,७१,४२०
पुरुष मतदार : २१,३४,९३२
महिला मतदार : २०,३६,३८९
तृतीयपंथी : ९९
एकूण मतदान केंद्र : ४४१२
एकूण मतदार संघ : १२
एकूण उमेदवार - १४६

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Appointment of volunteers for the handicapped and senior voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.