'लॉकडाऊन' केवळ नागपूर शहरात  : अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:31 PM2020-03-20T21:31:32+5:302020-03-20T22:46:21+5:30

नागपूर शहर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारतर्फे येथे पूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले आहे. सध्या हा निर्णय केवळ नागपूर शहरापुरता घेण्यात येत आहे.

Lockdown only in Nagpur city: Essential services will continue | 'लॉकडाऊन' केवळ नागपूर शहरात  : अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

'लॉकडाऊन' केवळ नागपूर शहरात  : अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देटोल नाक्यांवर होणार स्क्रीनिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारतर्फे येथे पूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले आहे. सध्या हा निर्णय केवळ नागपूर शहरापुरता घेण्यात येत आहे. बुटीबोरी, उमरेड, कामठीसारख्या भागात तो लागू राहणार नाही. परंतु सावधगिरी बाळगली जात आहे. दारुची दुकाने, बार, रेस्टॉरंट बंद राहतील. राज्य व शहराच्या सीमेवरील सर्व टोल नाक्यावर स्क्रिनींग सुरू करून शहरात कुठल्याही कोरोनाग्रस्ताला प्रवेश करू दिला जाणार नाही. टोल नाक्यावर असा रुग्ण सापडला तर त्याला थेट रुग्णालयात दाखल केले जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कार्य असेल तरच घराबाहेर जाण्याची परवानगी असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील. साप्ताहिक बाजारासह सर्व बाजार बंद राहतील. दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट, पानठेले आदी अगोदरच बंद आहे. अत्यावश्यक कार्यालयच खुले राहतील. या कार्यालयांना २५ टक्के मनुष्यबळावर काम करावे लागेल. खेळ, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर रोख लावण्यात आली आहे. शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. पेंच, कऱ्हांडला सारखे अभयारण्य बंद करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर आदी उपस्थित होते.
क्वॉरंटाईनसाठी ४२० बेड
पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, विदेशातून येणाऱ्यांना १४ दिवस इतरांपासून वेगळे (क्वारंटाईन) ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आमदार निवासात २१० खोल्यांमध्ये ४२० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मानसोपचार तज्ज्ञाचीही व इंटरनेटचीही व्यवस्था आहे.

आमदार निवासात नव्याने १४ संशयित 
आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात आज १४ संशयित दाखल झाले. हे सर्व भारतीय असून ते विदेशातून आले आहेत. 

सावध राहा, लक्षण दिसताच पुढे या
पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार प्रत्येक स्तरावर प्रयत्न करीत आहे. आरोग्य विभाग, पोलीस व प्रशासकीय मशीनरी युद्धस्तरावर काम करीत आहे. नागरिकांनीही सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये घरी राहूनच काम करावे, सावधगिरी बाळगावी, कोरोनाची लक्षणे आढळून येताच पुढे यावे. 

मुंबईवरून येणार सॅनेटायझर, प्रोटेक्शन किटसाठी केंद्राकडे मागणी
यावेळी पालकमंत्री राऊत यांनी स्पष्ट केले की, मास्क, सॅनेटाईझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. सॅनेटाईझरची कमतरता लक्षात घेता मुंबईवरून पुरवठ्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयांमध्ये ग्लब्सचा उपयोग अनिवार्य करण्यात आला आहे. डॉक्टर व परिचारिकांच्या प्रोटेक्शन किटचा पूरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. 

नियंत्रण कक्षात ७०२ कॉल 
 आढावा बैठकीत सांगण्यात आले की, जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेत नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. यात आतापर्यंत ७०२ कॉल आले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. 

Web Title: Lockdown only in Nagpur city: Essential services will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.