लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:16 AM2020-05-24T10:16:37+5:302020-05-24T10:17:43+5:30

यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत.

Lockdown has pushed up the price of red chillies | लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. प्रत्येक राज्यातून आवक आणि दर्जानुसार कळमन्यात भाव १२० ते १५५ तर किरकोळमध्ये १८० ते १९० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लॉकडाऊनमुळे यंदा लाल मिरचीचे भाव चढेच आहेत.
दैनंदिन आहारात तिखटाचे महत्त्व असून स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवण झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी मसाल्यासह तिखटाची गरज असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात महिलातर्फे लाल मिरची खरेदी करून वर्षभराचे तिखट तयार करण्याची परंपरा आहे. पण यावर्षी अनेकांनी मिरची खरेदी केलीच नाही. लॉकडाऊनच्या काळात प्लास्टिकबंद तिखट खरेदी करून स्वयंपाकाची गरज भागविली. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रारंभीच्या काळात आवक झालीच नाही. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मालवाहतुकीची परवानगी घेऊन आवक सुरू झाली.

कळमना बाजाराचे अडतिये आणि व्यापारी संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजार आठवड्यात केवळ सोमवारी एक दिवस भरतो. गेल्या सोमवारी बाजारात जवळपास १५ हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्येक पोते हे ३० ते ४० किलोचे असते. सर्वाधिक आवक आंध्र प्रदेशातून असते. पण यंदा आवक कमीच आहे. येथील शेतकऱ्यांनी मिरची कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहे. या राज्यात जवळपास ६० लाख पोती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटल्यानंतर आवक वाढेल, त्यानंतरच भाव कमी होतील. पुढील सोमवारी आवकीनंतरच भाव ठरेल.
वाधवानी म्हणाले, कळमन्यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचे भाव १४० ते १५५ रुपयांदरम्यान आहेत. गेल्यावर्षी भाव १२० ते १३५ रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी गुंटूर मिरचीचे भाव १६० ते १६५ रुपयांवर पोहोचले होते. पण आता कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील सिरोंचा मिरचीचे भाव १२० ते १३५, राजुरा मिरची १३० ते १५० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कळमन्यात मिरचीची आवक कमी झाली आहे. ८ ते १० वर्षांपूर्वी आठवड्यात ७० ते ८० हजार पोत्यांची आवक व्हायची, पण आता १५ हजार पोत्यांपर्यंत कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी राज्याराज्यातून परस्पर खरेदी सुरू केल्याने कळमन्यातील व्यापार कमी झाला आहे. मिरचीची निर्यात मलेशिया, चीन, श्रीलंका, थायलँड, सौदी अरब आणि अन्य देशात होते.

लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात तर त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. आंध्र प्रदेशात मिरचीचे कोल्ड स्टोरेज सर्वात जास्त आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन होणाऱ्या लाल मिरचीची चव वेगवेगळी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मिरचीचा रंग लाल व चमकदार, मध्यम तिखट असते. याशिवाय खम्मम विभागात उत्पादित होणारी तेजा मिरची जगभर प्रसिद्ध आहे. ही मिरची जास्त तिखट असलेली ओळखली जाते. तिखट खाणाऱ्या लोकांची या मिरचीला मागणी असते. कर्नाटकातील बेडगी भागात उत्पादन होणारी मिरचीचा रंग भडक, सौम्य तिखट असते. त्यामुळे या मिरचीला तारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी असते.

 

Web Title: Lockdown has pushed up the price of red chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.