‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 06:41 IST2025-12-07T06:39:36+5:302025-12-07T06:41:10+5:30

राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्वभूमीवर फक्त एक आठवड्याच्या कालावधीत होत असलेले हे अधिवेशन अत्यंत तापलेले राहण्याची चिन्हे आहेत.

'Local' election battle; 'Winter' session to be stormy; Starts in Nagpur from tomorrow; Opposition boycotts tea party | ‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवापासून नागपुरात सुरू होत आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्वभूमीवर फक्त एक आठवड्याच्या कालावधीत होत असलेले हे अधिवेशन अत्यंत तापलेले राहण्याची चिन्हे आहेत.

महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली. वर्षभरात केलेल्या कामांचा, घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा घेऊन सरकार सभागृहात विरोधकांची नाकाबंदी करताना दिसेल. सध्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. यामुळे दुखावलेले विरोधक ताकदीने एकत्र आले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी राहणार

अधिवेशनात शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत. माजी आ. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी ३० जूनची मुदत जाहीर केली. मात्र, त्यावर विरोधक समाधानी नाहीत.

कापूस आणि सोयाबीनला मिळणारा अल्प भाव, बाजारात करण्यात आलेल्या कृत्रिम दर कपातीचे आरोप, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेला विलंब, आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला जाब विचारतील.

निवडणुकांची राहील अधिवेशनावर छाप

राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांची छाप अधिवेशनावर राहील.

प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मजबूत करण्याच्या प्रयत्नात असून, सभागृहातील प्रत्येक मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात एकूण ११ विधेयके मांडली जातील. त्यातील सहा अध्यादेश तर पाच नवीन विधेयके असतील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या राज्य सरकारकडून सभागृहात सादर करण्यात येणार आहेत.

सरकारची कोंडी करण्यासाठी सज्ज आहोत, असा संदेश देण्यासाठी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन कमी दिवसांचे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री संजय शिरसाठ आणि इतर मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकारवर हल्ला चढवण्याची विरोधकांची तयारी आहे.

Web Title : स्थानीय चुनाव की गर्मी, शीतकालीन सत्र तूफानी, नागपुर शुरुआत, चाय का बहिष्कार

Web Summary : महाराष्ट्र का नागपुर में शीतकालीन सत्र स्थानीय चुनावों के बीच राजनीतिक गर्मी का अनुमान है। विपक्ष ने चाय का बहिष्कार किया, किसान मुद्दों और भ्रष्टाचार के आरोपों पर सरकार को चुनौती देने की तैयारी कर रहा है। मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री के बीच समन्वय पर ध्यान दिया जाएगा।

Web Title : Local Election Heat, Winter Session Stormy, Nagpur Start, Boycott Tea

Web Summary : Maharashtra's winter session in Nagpur anticipates political heat amid local elections. Opposition boycotts tea, gearing up to challenge the government on farmer issues and corruption allegations. Focus will be on coordination between CM and Deputy CM.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.