कोरोनाच्या दाेन वर्षांच्या संकटानंतर आयुष्य पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 08:00 AM2022-03-11T08:00:00+5:302022-03-11T08:00:08+5:30

Nagpur News सलग दाेन वर्षे कोरोना संकटापुढे हतबल झालेल्या नागपूरकरांना तिसऱ्या लाटेनंतर दिलासा मिळाला. पुन्हा पहिल्यासारखं आयुष्य जगायला सुरुवात झाली.

life on track after a crisis of two years corona | कोरोनाच्या दाेन वर्षांच्या संकटानंतर आयुष्य पूर्वपदावर

कोरोनाच्या दाेन वर्षांच्या संकटानंतर आयुष्य पूर्वपदावर

Next
ठळक मुद्दे११ मार्च २०२० रोजी आढळला होता नागपुरात पहिला रुग्णआतापर्यंत ५,७७,६६६ रुग्ण, ५,६७,२१७ रुग्ण बरे

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोजी नागपूरच्या बजाजनगरात आढळला आणि त्यानंतर सलग दाेन वर्षे भीती, अस्थिरता, चिंता, असुरक्षितता व मृत्यूने थैमान घालायला सुरुवात झाली. मृत्यूच्या भीषण छायेखाली कोरोनाचे ५ लाख ७७ हजार ६६६ रुग्ण होरपळून निघाले. १०,३३७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. याचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक परिणाम झाला. सलग दाेन वर्षे कोरोना संकटापुढे हतबल झालेल्या नागपूरकरांना तिसऱ्या लाटेनंतर दिलासा मिळाला. पुन्हा पहिल्यासारखं आयुष्य जगायला सुरुवात झाली.

अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला ४२ वर्षीय पुरुष रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. १२ मार्च रोजी या रुग्णाची पत्नी आणि या रुग्णासोबत अमेरिकेहून आलेल्या पुरुष रुग्णही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. विषाणूला रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला. कोरोनाच्या संसर्गावर मर्यादा कशी घालायची, विषाणूचा प्रसार कसा रोखायचा, रोगावर संभाव्य औषधे कोणती वापरायची यावर मार्ग शोधणे सुरू झाले. ‘लॉकडाऊन’मुळे जनजीवन ठप्प झाले. मात्र, आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले मेयो, मेडिकल, एम्ससह महानगरपालिकेची दवाखाने व खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन रुग्णसेवा केली. यामुळे अनेकांना नवे जीवन मिळाले.

-पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण

मार्च २०२० पासून सुरू झालेली कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर महिन्यात आपल्या उच्चांकावर होती. या महिन्यात ४४ हजार ६४७ रुग्ण आढळून आले होते, तर १,४६५ रुग्णांचा मृत्यू झाला. डिसेंबर २०२० पर्यंत १ लाख ३९ हजार ५६ रुग्ण आढळून आले होते.

-दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने गाठला उच्चांक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी २०२१ पासून सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात १,८१,७४९ या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. २ हजार २९० रुग्णांना आपल्या जीवाला मुकावे लागले. या वर्षात ३ लाख ५४ हजार ९९३ रुग्णांची नोंद झाली.

-तिसरी लाट सौम्य, जानेवारीत सर्वाधिक रुग्ण

व्यापक लसीकरणामुळे तिसरी लाट सौम्य ठरली. यामुळे जवळपास पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्यातही दोन ते तीन टक्केच रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. जानेवारी २०२२ मध्ये सर्वाधिक म्हणजे, ६७ हजार ५१४ रुग्ण आढळून आले व १२७ रुग्णांचे बळी गेले. सध्या ही लाट ओसरली असून, सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

-नागपूर जिल्ह्यातील तीन वर्षांतील कोरोनाची स्थित (९ मार्च २०२२पर्यंत)

एकूण रुग्ण : ५,७७,६६५

इतर जिल्ह्यातील रुग्ण : ९,९४४

एकूण मृत्यू : १०,३३७

इतर जिल्ह्यातील मृत्यू : १,६६८

एकूण बरे झालेले रुग्ण : ५,६७, २१७

इतर जिल्ह्यातील बरे रुग्ण : ९,९४४

एकूण चाचण्या : ५३,५०,२७९

Web Title: life on track after a crisis of two years corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.