Lata didi is my inspiration: Usha Mangeshkar | लता दीदी हीच माझी प्रेरणा : उषा मंगेशकर
लता दीदी हीच माझी प्रेरणा : उषा मंगेशकर

ठळक मुद्देगप्पा, गाण्यांमधून उलगडला प्रवास : हार्मोनी ईव्हेंटचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संगीताच्या सागरातील लता मंगेशकर, आशा भोसले व उषा मंगेशकर या तीन महत्त्वाच्या धारा. त्यातील एक प्रवाह साक्षात उषा मंगेशकर यांनी शुक्रवारी नागपूरकर श्रोत्यांशी संवाद साधला व दिलखुलास अंदाजात गाणीही सादर केली. या क्षेत्रात दीदीच माझी प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगत त्यांनी लता, आशा व त्यांची स्वत:ची गाणी गायली व सात दशकांच्या संगीत प्रवासाला उजाळा दिला. गप्पा व गाण्यांच्या या संगीतमय कार्यक्रमाने रसिकांना चिरकाळ टिकणारी आठवण प्रदान केली.
सखे सोबती फाउंडेशन आणि हार्मोनी इव्हेंटस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उषा मंगेशकर लाईव्ह’ हा ‘त्रिवेणी’ संगम असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले. नागपूरने ग्रेस, सुरेश भट व अनिलांसारखे मोठे कवी दिल्याचे सांगत या शहराप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लता दीदीच्या रिकार्डींगमध्ये जाउन बसायची. वडिलांकडून संगीत आले आणि दीदी आमची प्रेरणा ठरली. त्यांच्याकडूनच उर्दु, हिंदी, बंगाली आदी भाषा कशा बोलायच्या, गायच्या हे शिकले. गाणे कसेही असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर शांतपणा असायचा. त्याचप्रमाणे आशा दीदी यांच्या गाण्यांनीही प्रभावित असल्याचे त्यांनी सांगितले. लता दीदीचा स्वर जसा मधूर आहे तशीच ती मधूर आहे. कधी कुणावर रागावली नाही आणि आम्हा भावंडांवर, आप्तांवर कायम प्रेम केल्याचे त्या म्हणाल्या.
त्यांनी गणेश वंदनेतून गायनाला सुरुवात केली. त्यानंतर लता यांनी गायलेले व रामलक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले ‘दिल दिवाना बिन सजना के...’ हे गीत गाताच श्रोत्यांनी टाळ््यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. लगचे त्यांनी दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटातील ‘माळ््याच्या मळ्यामंधी कोण ग उभी...’ हे मराठी गाणे सादर केले. पुढे गप्पांसह त्यांच्या सुरांची रागिणी अशीच निनादत राहिली. सहगायकांसह ‘छुप गये सारे नजारे..., छबीदार छबी मी तोºह्यात उभी..., ऐरणीच्या देवा तुला..., जय जय शिव शंकर...’ ही गाणे सादर करीत प्रचंड लोकप्रिय असलेले ‘मुंगडा...’ हे गाणही तेवढ्याच दिलखुलास अंदाजात सादर केले.
या कार्यक्रमात आकांक्षा नगरकर, गौरी शिंदे, पुण्याची मनीषा निश्चल, सागर मधुमटके, ज्योतीर्रमन अय्यर, पल्लवी दामले व पलक आर्या या गायकांनीही या त्रिवेणी भगिणींच्या एकल आणि ड्यूएट गीतांची मेजवानी श्रोत्यांना दिली. उषाताई यांनी यावेळी सागर यांच्या आवाजाचे व अमर शेंडे यांच्या व्हायोलिनचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी गिरीश गांधी, प्रफुल मनोहर, त्रिवेणी वैद्य, रवी अंधारे, विजय जथे, राजेश समर्थ दीपक साने, राजेश खडीया प्रामुख्याने उपस्थित होते.


Web Title: Lata didi is my inspiration: Usha Mangeshkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.