शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठरला अखेरचा शनिवार गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 09:47 PM2020-02-15T21:47:01+5:302020-02-15T21:49:22+5:30

शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला.

Last Saturday was sweet for government employees | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठरला अखेरचा शनिवार गोड

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठरला अखेरचा शनिवार गोड

Next
ठळक मुद्देपाच दिवसाच्या कामकाजामुळे कर्मचारी खूश : शासनाच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला. शासकीय कर्मचाऱ्यांनीही अखेरच्या शनिवारी आनंदात काम केले आणि सायंकाळी कामकाज संपल्यानंतर शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
२९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होत असला तरी, १५ फेब्रुवारीचा शनिवार हा या महिन्यातील तिसरा शनिवार होता. या निर्णयापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असल्याने कामकाजाचा हा अखेरचा शनिवार ठरला. यापुढे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात शनिवार हा दिवस कधीही कामकाजाचा दिवस म्हणून येणार नाही. पण यातून ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहे त्यांना या शासन निर्णयाचा लाभ मिळणार नाही.
नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाची २८८ कार्यालये आहे. शहरात बहुतांश कार्यालये सिव्हील लाईन्स परिसरात आहे. एरवी सहा दिवस येथे वर्दळ असायची, पण आता आठवड्यात दोन दिवस या परिसरात शुकशुकाट राहणार आहे. राज्य शासनाचे ३० ते ३५ टक्के कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. २५ ते ३० टक्के कर्मचारी ४० ते ५० वयोगटात आहे. शासनाने २०१२ नंतर मोठ्या प्रमाणात भरतीला ब्रेक लावल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. अतिरिक्त कामांचा भार कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्यामुळे शासनाने दिलेली दोन दिवसाची सुटी योग्य असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
 यापूर्वीही झाला होता ५ दिवसाचा आठवडा
विशेष म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ६ दिवस ठरविण्यात आले होते. तेव्हा १०.३० ते ५.३० अशी कामाची वेळ होती. परंतु सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना ५ दिवसाचा आठवडा करण्यात आला होता. जवळपास ६ महिने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसाच्या सुट्याही मिळाल्या होत्या. परंतु हा निर्णय मागे घेऊन दुसरा आणि चौथा शनिवार सुटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यत वाढविण्यात आली होती. आता परत २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहणार आहे.

Web Title: Last Saturday was sweet for government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.