गुंतवणूकदारांच्या रकमेतून खरेदी केली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:02 AM2019-08-13T00:02:22+5:302019-08-13T00:03:21+5:30

कोट्यवधी रुपयाचा अपहार करणाऱ्या आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह

Land purchased from investor funds | गुंतवणूकदारांच्या रकमेतून खरेदी केली जमीन

गुंतवणूकदारांच्या रकमेतून खरेदी केली जमीन

Next
ठळक मुद्देआनंद साईच्या संचालकांना २० पर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधी रुपयाचा अपहार करणाऱ्या हुडकेश्वर येथील आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांच्या रकमेतून जमीन खरेदी केली होती. चुकीच्या पद्धतीने ही खरेदी करून सोसायटीला चुना लावला आहे. यादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या संचालकांना सोमवारी न्यायालयासमोर सादर करून, २० ऑगस्टपर्यंत त्यांची पोलीस कोठडी घेतली आहे.
आर्थिक शाखेने सोसायटीतर्फे पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आणले आहे. पोलिसांनी रविवारी सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद नारायण घोगरे, सचिव संजय मनोहर भगत, मॅनेजर ज्ञानेश्वर पांडुरंग उमरेडकर आणि अकाऊंटंट धीरज चरणदास नगरकर यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र गुंतवणूक हित संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
सोसायटीमध्ये ५,८०० गुंतवणूकदार आणि सदस्य आहेत. २०१४ ते २०१७ दरम्यान आरोपींनी बोगस पद्धतीने अनेक लोकांना कर्ज दिले. त्यांनी बाहेरच्या व्यक्तींनाही कर्ज वाटले. बोगस दस्तावेज बनवून काही कर्जदारांनी कर्ज परत केल्याचे दर्शविले. गुंतवणुकीचा अवधी पूर्ण न होऊनही पैसे परत न केल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. त्यांनी आरोपींची भेट घेतली. तेव्हा आरोपी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. त्यामुळे संशय आणखी बळावला.
गुंतवणूकदारांनी या प्रकरणाची तक्रार केली. या आधारावर पतसंस्थेच्या जिल्हा विशेष लेखा परीक्षक अनिल पाटील यांनी सोसायटीच्या व्यवहाराची तपासणी केली. यात पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. या आधारावर ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मिलिंद घोगरेच्या पत्नीलाही आरोपी बनविले आहे. पोलीस अटक केलेल्या आरोपींची विचारपूस करीत आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचाही पत्ता लावला जात आहे. सोसायटीचे मुख्य कार्यालय शारदा चौकात आहे. अमरनगर याशिवाय नरखेड आणि कोंढाळीतही शाखा आहे. सोसायटीतील बहुतांश सदस्य मध्यमवर्गीय आहेत.

Web Title: Land purchased from investor funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.