Kasturba Gandhi Memorial Day Special: 'Ba' had an emotional relationship with Nagpur | कस्तुरबा गांधी स्मृतीदिन विशेष: ‘बां’चे नागपूरशी होते भावनिक नाते

कस्तुरबा गांधी स्मृतीदिन विशेष: ‘बां’चे नागपूरशी होते भावनिक नाते

ठळक मुद्दे भावना त्यागून जगल्या कर्मठ गांधीमार्गजनसेवेची तळमळ

गोपालकृष्ण मांडवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्तुरबा गांधी आणि नागपूरचे नाते अधिक भावनिक होते. कारणही तसेच होते. महात्मा गांधी नागपुरात येत असत तेव्हा कस्तुरबा गांधी नेहमी सोबत असतच. बापूंच्या आयुष्यप्रवासात त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या कस्तुरबा यांच्यासाठी नागपूर मात्र संवेदनशील आणि भावनिक विषय होता. याचे कारण होते त्यांचा मुलगा हरीभाई.
गांधीजी आणि कस्तुरबा गांधी नागपुरात येत तेव्हा त्यांचा मुक्काम राकाजींच्या घरी असे. १९२० मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने गांधींचे नागपुरात येणे बरेच वाढले. इंग्रज सरकारशी असहकार करण्याचा मंत्र त्यांनी दिला. त्यातून नागपुरात ‘असहयोग आश्रम’ची स्थापना झाली.
या आश्रमासाठी १९२८ मध्ये उमरेड रोेडवर जमीन भेट मिळाली. जनरल आवारी याच आश्रमात एका खोलीत राहायचे. या असहयोग आश्रमात दररोज सकाळी, सायंकाळी प्रार्थना होत असे. सूत कताई, परसबाग, गृहोद्योग असे उपक्रम चालायचे.
जनरल मंचरशा आवारी आणि आई दलेरबानु आवारी यांच्या तोंडून बरेचदा ऐकलेली आठवण गेव्ह आवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितली. कस्तुरबा गांधी नागपुरात आल्यावर सकाळी राकाजींच्या घरून दलेरबानु आवारी यांच्याकडे तयारीसाठी यायच्या.
तिथे प्रार्थनेलाही त्या उपस्थित असत. १९३७ मध्ये गांधीजींचा दुसरा मुलगा हरीभाई गांधी यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. नागपुरातील तेलंगीपुरा येथे ते राहायला लागले. हरीभार्इंचे वडिलांशी फारसे पटत नसे. मात्र आईच्या ओढीने ते असहयोग आश्रमात मागच्या दाराने यायचे.
आईला संत्री आवडतात म्हणून संत्री घेऊन यायचे. आईला भेटून परत जायचे. मात्र परत जाताना ‘कस्तुरबा गांधी जिंदाबाद’ अशा घोषणा देत जायचे. आईचे हृदय घेऊन गांधींसोबत वावरणाºया कस्तुरबांचे भावनिक नाते हे असे होते.

साधी राहणी
कस्तुरबा गांधी यांनी राहणी अगदी साधी होती. महात्मा गांधींची पत्नी असा अभिनिवेश त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच नव्हता. त्या कर्मठपणे गांधीमार्गाने जगल्या. असहकार आश्रमातून सकाळी गांधींजीसोबत सारेजण निघत. कस्तुरबा गांधीही सोबत असायच्या. या सर्वांची न्याहरी हरिजन वस्तीमध्ये होत असे. गांधींसोबत त्या मंचावरही उपस्थित असायच्या. महिलांच्या सभेत मार्गदर्शनही करायच्या.

अडथळ्यांचा सामना करून मुलींच्या शाळेचे उद्घाटन
महिलांना कमी लेखले जात असल्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी पुढाकार घेत. त्यांची ही तळमळ नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीने अनुभवली होती. १९३० साली मुलींच्या शाळेच्या उद्घाटनासाठी कस्तुरबा गांधी यांनी विविध अडथळ्यांचा सामना केला होता व जिद्दीने त्या शाळेच्या उद्घाटनाला पोहोचल्या होत्या.
पारशिवनी येथे चिंतामणराव तिडके यांनी मुलींसाठी शाळा सुरु करण्याचा मानस केला होता व शाळेच्या उद्घाटनप्रसंगी मौलिक मार्गदर्शनसाठी कस्तुरबा गांधी यांनी येण्याचे वचन दिले होते. त्या काळी चांगले रस्ते नव्हते. आपली वचनपूर्ती करण्यासाठी व मुलींना नवा हुरुप देण्यासाठी कस्तुरबा जानकीबाई बजाज, महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी गोमतीबाई बेन यांच्यासमवेत वर्ध्याहून पारशिवनीसाठी निघाल्या. रामटेकला पोहोचल्यानंतर रस्ता नसल्याने त्या जवळील गावापर्यंत नावेतून गेल्या. पावसाळ्याचे दिवस असतानादेखील त्यांनी त्यानंतर चिखलाने भरलेल्या रस्त्यातून कधी पायी तर कधी बैलगाडी, असा प्रवास करत पारशिवनी गाठले होते.

असे घडले नागपुरातील कस्तुरबा भवन
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपुरातील बजाजनगरात गांधी भवन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला व विनोबा भावे यांच्या हस्ते १९६५ ला भूमिपूजन झाले होते. २ आॅक्टोबर १९६८ साली कमलाबाई होस्पेट यांच्या हस्ते कोनशिलान्यास झाला व जयप्रकाश नारायण यांनी उद्घाटन केले होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभागात गांधी भवन होते. त्यामुळे एकाच भागात दोन गांधी भवन असल्याने कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होते. त्यामुळे १९९० मध्ये या भवनाला कस्तुरबा भवन असे नाव देण्यात आले, अशी माहिती महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील यांनी दिली.

Web Title: Kasturba Gandhi Memorial Day Special: 'Ba' had an emotional relationship with Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.