पोक्सो प्रकरणातील ठाणेदाराच्या भूमिकेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:36 AM2019-09-22T00:36:44+5:302019-09-22T00:39:11+5:30

अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न करण्याच्या प्रकरणात लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांची काय भूमिका आहे, कशामुळे त्यांनी पोक्सोचे हे गंभीर प्रकरण प्रारंभी बेदखल केले होते, त्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी जवळपास पूर्ण केली आहे.

Investigation into PSO's role in POCSO case | पोक्सो प्रकरणातील ठाणेदाराच्या भूमिकेची चौकशी

पोक्सो प्रकरणातील ठाणेदाराच्या भूमिकेची चौकशी

Next
ठळक मुद्देएसीपींचा चौकशी अहवाल तयार : सोमवारी होणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न करण्याच्या प्रकरणात लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांची काय भूमिका आहे, कशामुळे त्यांनी पोक्सोचे हे गंभीर प्रकरण प्रारंभी बेदखल केले होते, त्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी जवळपास पूर्ण केली आहे. सोमवारी हा चौकशी अहवाल मुंढे यांच्याकडून परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्यापुढे ठेवला जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणात कोणती कारवाई करायची, त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
लकडगंजमधील एका गरीब घरच्या मुलीला(वय १५)प्रेमजाळ्यात ओढून एका आरोपीने तिच्या भविष्यासोबत नव्हे तर आयुष्यासोबतच खेळ केला आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार मुलीच्या आईने लकडगंज पोलीस ठाण्यात नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. यात तातडीने पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, लकडगंजचे ठाणेदार पिदूरकर यांनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षिकेला (डब्ल्यू पीएसआय) कर्तव्यापासून परावृत्त करून ही तक्रार ‘अदखलपात्र’ (एनसी) करण्याचे सुचविले. या गंभीर प्रकरणाची माहिती सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांना मिळाली. त्यांनी ती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांना सांगितली. उपायुक्त माकणीकर यांनी तडकाफडकी ठाणेदार पिदूरकर यांना याबाबत जाब विचारला. प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळताच ‘मामाचा तक्रारअर्ज’ पुढे करण्यात आला. मात्र, हे गंभीर प्रकरण मुलीच्या आयुष्याशी जुळले असल्यामुळे उपायुक्त माकणीकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश उपायुक्त माकणीकर यांनी एसीपी मुंढे यांना दिले. त्यानुसार, मुढे यांनी प्राथमिक चौकशी करून या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अर्थात प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीतच ठाणेदाराने गुन्हा दाखल न करण्याची गंभीर चूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कोणत्या कारणामुळे ठाणेदाराने पोक्सो प्रकरणात एवढी मोठी ‘रिस्क’ पत्करली त्याची चौकशी होणे बाकी होते, ती देखील आता पूर्ण झाल्याची माहिती आहे. हा चौकशी अहवाल पुढच्या दोन दिवसांत आपण पोलीस उपायुक्तांपुढे ठेवू, त्यानंतर वरिष्ठ पुढच्या कारवाईची दिशा ठरवतील, असे सहायक आयुक्त मुंढे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Investigation into PSO's role in POCSO case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.