नागपुरात आंतरराज्यीय सिसोदिया टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:42 AM2020-02-17T10:42:04+5:302020-02-17T10:45:37+5:30

तारांकित हॉटेल अथवा बड्या सेलिब्रेशन हॉल, लॉनमधील लग्नसमारंभात सहभागी होऊन लाखोंचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. सिसोदिया टोळी नावाने कुख्यात असलेल्या या टोळीतील एका बालकासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

An inter-state Sisodia gang arrested in Nagpur | नागपुरात आंतरराज्यीय सिसोदिया टोळीचा छडा

नागपुरात आंतरराज्यीय सिसोदिया टोळीचा छडा

Next
ठळक मुद्देमहिलेसह तिघांना अटक सोने व हिरेजडित दागिने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तारांकित हॉटेल अथवा बड्या सेलिब्रेशन हॉल, लॉनमधील लग्नसमारंभात सहभागी होऊन लाखोंचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. सिसोदिया टोळी नावाने कुख्यात असलेल्या या टोळीतील एका बालकासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. सन्नी हरिप्रसाद छायल (वय ३२), मोहित महेंद्र सिंग (वय २६) आणि बबाबाई निरंजन सिसोदिया (वय ४५), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोने आणि हिºयाच्या दागिन्यांसह ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी यासंबंधाने रविवारी माहिती दिली. उपरोक्त सर्व आरोपी मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील कडिया चौरसिया सांसी येथील रहिवासी आहेत.
छोट्या मुलांचा वापर करून ही टोळी मोठमोठे हात मारत होते. तारांकित हॉटेल किंवा लॉनमध्ये असलेल्या श्रीमंत घरातील लग्नसोहळ्यात सुटाबुटात या टोळीतील आरोपी सहभागी होतात. त्यांच्यासोबत एक छोटा मुलगा असतो. चांगले ब्लेझर घालून वावरत असल्याने त्यांच्यावर कुणी संशय घेत नाही. छोटा मुलगा वर-वधूच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या अवतीभवती किंवा स्टेजवर घुटमळतो. लहानगा असल्याने त्याच्याकडेही फारसे कुणी लक्ष देत नाही. वर-वधू किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हातातील पैशाची, दागिन्याची बॅग बाजूला ठेवताक्षणीच तो मुलगा ती उचलतो. नंतर ती बॅग मोठे आरोपी ताब्यात घेऊन तेथून गायब होतात. रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये असलेल्या एका उच्च पोलीस (आयपीएस) अधिकाऱ्याच्या नातेवाईकाच्या लग्नसमारंभारत या टोळीने ९ फेब्रुवारीला अशाच प्रकारे एका बॅगवर हात मारला होता. हिरेजडित दोन बांगड्या, कानातील रिंग, सोनसाखळ्या, पेंडंट, हिरेजडित सोन्याच्या अंगठ्या, बिस्कीट आणि चांदीची नाणी तसेच रोख रक्कम असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. मुकुंद रामप्रसाद गणेरीवाल (वय ५९, रा. नवीन सुभेदार ले-आऊट) यांनी यासंबंधाने तक्रार सीताबर्डी ठाण्यात नोंदवली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथकही करीत होते. हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा छडा लावून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दुपारी या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून उपरोक्त दागिने आणि १४,५९७ तसेच सहा मोबाईल जप्त केले.

सात गुन्हे उघड
सोमवारी या टोळीला न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मिळविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी सांगितले. ही टोळी देशातील विविध प्रांतात अशाच प्रकारे चोरी करते. लहान मुलगा आणि महिला सोबत असल्याने त्यांना राहण्याचे ठिकाण सहजपणे उपलब्ध होते. ठिकठिकाणी चोरी करूनही ही टोळी पकडली जात नाही. कारण ते लगेच दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. मात्र, आम्ही या टोळीचा सातत्याने माग काढत होतो. त्यामुळे टोळीचा छडा लागला, असे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त किशोर जाधव म्हणाले. या टोळीकडून सीताबर्डीतील गुन्ह्यासह लकडगंजमधील चार तसेच कळमना आणि गिट्टीखदानमधील प्रत्येकी एक असे एकूण सात चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचेही एसीपी जाधव यांनी सांगितले.

कॅश रिवॉर्ड मिळणार
पोलिसांना नेहमीच गुंगारा देणाऱ्या या टोळीच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी युनिट-५ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहायक निरीक्षक अनिल मेश्राम, अमोल काचोरे, हवालदार उमेश खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक भलावी, तुलसी शुक्ला, सुनील चौधरी, नायक सुनील ठवकर, दिनेश चाफलेकर, अनिल बावणे, रवी राऊत, उत्कर्ष राऊत, विजय यादव, पंकज लांडे, फराज खान, अमोल भक्ते, प्रवीण मोरे आदींनी बजावली. त्यांना पोलीस आयुक्तांमार्फत कॅश रिवॉर्ड मिळणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी सांगितले.

बालगुन्हेगार सात वर्षांपासून सक्रिय
उपरोक्त आरोपींसोबत ताब्यात घेतलेला बालगुन्हेगार १४ वर्षांचा आहे. तो सात वर्षांपासून या टोळीत सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजवरून या टोळीचा माग काढून त्यांना ताजबाग परिसरातून पोलिसांनी अटक केली. भाड्याच्या खोलीत चोरटे राहत होते, अशी माहिती यावेळी या टोळीच्या मुसक्या बांधण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे गुन्हे शाखेच्या युनिट-५ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितली.

Web Title: An inter-state Sisodia gang arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.