कळमना पूल दुर्घटनेची होणार चौकशी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 11:43 AM2021-10-21T11:43:06+5:302021-10-21T11:52:51+5:30

कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग १९ ऑक्टोबरला रात्री ९:३० च्या सुमारास कोसळला. सेगमेंटच्या खाली असलेले बेअरिंग्ज खराब झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे. मात्र, तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या सविस्तर तपासणीनंतर नेमके कारण कळणार आहे.

Inquiry committee for Kalmana bridge accident in nagpur | कळमना पूल दुर्घटनेची होणार चौकशी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय

कळमना पूल दुर्घटनेची होणार चौकशी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय

Next
ठळक मुद्देतीन सदस्यीय समितीमार्फत होणार चौकशी : सध्या काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचआयने १९ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील पारडी उड्डाणपुलाचा एक भाग कोसळण्यामागील कारणांची चौकशी करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समिती या घटनेची चौकशी करेल आणि समितीने अहवाल सादर केल्यानंतर आवश्यक ती पावले उचलली जातील, असे प्राधिकरणातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पारडी उड्डाणपुलाचे काम मेसर्स गॅनन डंकर्ले अँड कंपनी लिमिटेड आणि मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संयुक्तरीत्या करत आहे. पूर्व नागपूरच्या या निर्माणाधीन पारडी उड्डाणपुलाच्या कळमना ते एचबी टाऊन या मार्गावरील एक भाग सेगमेंट १९ ऑक्टोबरच्या रात्री ९ च्या सुमारास पिलर पी ७ वरून सरकला आणि जमिनीवर पडला. पडलेल्या सेगमेंटचे दुसरे टोक अजूनही पिलर पी ८ वर आहे. तथापि, या घटनेचे कारण कळाले नसून प्रथमदर्शनी सेगमेंटच्या खाली असलेले बेअरिंग्ज खराब झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे. मात्र, तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या सविस्तर तपासणीनंतर नेमके कारण कळणार आहे. सध्या या पिलरच्या ठिकाणी कोणतेही काम केले जात नव्हते.

या पुलाचा पी ७ - पी ८ मधील सेगमेंट २० जानेवारी-२०१८ रोजी आणला असून, १३ एप्रिल २०१८ रोजी बसविण्यात आला आहे. हा सेगमेंट ५५ एमएम, काँक्रिट ग्रेडचा होता आणि जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत कोणत्याही बिघाडीचे संकेत मिळाले नाही. उभारणीच्या वेळी सर्व चाचण्या प्राधिकरण अभियंत्यातर्फे घेतल्या असून, सध्या त्या ठिकाणी कोणतेही काम प्रगतिपथावर नव्हते. या घटनेत नागरिकांना किंवा कामगारांना कोणतीही इजा अथवा हानी झाली नाही.

Web Title: Inquiry committee for Kalmana bridge accident in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.