मेयोमध्ये वाढल्या पीजीच्या ३१ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:20 AM2020-02-16T00:20:39+5:302020-02-16T00:25:03+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (मेयो) शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तब्बल ३१ जागा वाढल्याचे ई-मेल धडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Increased PG seats in Mayo | मेयोमध्ये वाढल्या पीजीच्या ३१ जागा

मेयोमध्ये वाढल्या पीजीच्या ३१ जागा

Next
ठळक मुद्देऔषधनिर्माणशास्त्राच्या तीन पीएसएमच्या सातमायक्रोबायोलॉजीच्या चारबायोकेमिस्ट्रीच्या पाचबधिरीकरणाच्या पाच व सर्जरी विभागाच्या सात 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (मेयो) शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तब्बल ३१ जागा वाढल्याचे ई-मेल धडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वाधिक जागा जनऔषधवैद्यकशास्त्र व शल्यचिकित्सा विभागाच्या वाढल्या. या दोन्ही विभागात सात-सात जागांची भर पडली.
‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या निकषानुसार पूर्वी प्राध्यापकाला तीन, सहयोगी प्राध्यापकाला दोन तर सहायक प्राध्यापकाला एक ‘पीजी’ विद्यार्थी मिळत होता. आता ज्या सहयोगी प्राध्यापकाला तीन वर्षे पूर्ण झाली असतील व या काळात शोधनिबंध सादर केले असतील तर त्यालाही तीन जागा मिळणार आहेत. याशिवाय, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक असलेल्या एका ‘युनिट’कडे ४० खाटांचा वॉर्ड असेल तर अशा युनिटला पाच पीजीचे विद्यार्थी मिळतील. याशिवाय, ज्या युनिटमध्ये प्राध्यापक नाही, परंतु सहयोगी प्राध्यापक असून तीन वर्षांचा अनुभव आहे आणि दोन सहायक प्राध्यापक आहेत अशा युनिटलाही पाच पीजीचे विद्यार्थी देण्याचा निर्णय ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) घेतला. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना निकषानुसार वाढीव पीजीच्या जागांचा प्रस्ताव मे २०१९ पूर्वी सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मेयोने प्रस्ताव पाठविला होता. एमसीआयने विभागातील मनुष्यबळ व पायाभूत सोयींचे निरीक्षण केले होते.
अशा वाढल्या जागा
औषधीशास्त्र म्हणजे ‘फार्मेकोलॉजी’ विभागाच्या पूर्वी पीजीच्या दोन जागा होत्या. आता यात तीन जागांची भर पडल्याने पाच जागा झाल्या. जनऔषधवैद्यकशास्त्र (पीएसएम) विभागाच्या पूर्वी तीन जागा होत्या. आता सात जागा वाढल्याने एकूण १० जागा झाल्या. मायक्रोबायोलॉजीच्या पूर्वी चार जागा होत्या. आता चार जागा वाढल्याने आठ जागा झाल्या. बायोकेमिस्ट्रीच्या पूर्वी दोन जागा होत्या. आता पाच जागा वाढल्याने सात जागा झाल्या. बधिरीकरण विभागाच्या पूर्वी पाच जागा होत्या. आता पाच जागा वाढल्याने १० जागा झाल्या तर शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी विभागाच्या पूर्वी पाच जागा होत्या. यात सात जागा वाढल्याने १२ जागा झाल्या.

शल्यचिकित्सा विभागातील ‘पीजी’च्या सात जागा वाढून एकूण जागा १२ झाल्या आहेत, तर बधिरीकरण विभागातील ‘पीजी’च्या पाच जागा वाढून १० जागा झाल्या आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच रुग्णसेवेला होईल.
डॉ. अजय केवलिया
अधिष्ठाता, मेयो

Web Title: Increased PG seats in Mayo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.