निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:13 PM2019-09-25T22:13:56+5:302019-09-25T22:21:29+5:30

विदर्भात काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आयकर विभागाचे प्रधान संचालक (अन्वेषण) जय राज कालरा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

Income tax watch on black money in elections: Jai Raj Kajla | निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला

निवडणुकीत काळ्या पैशांवर आयकर विभागाचा 'वॉच' : जय राज काजला

googlenewsNext
ठळक मुद्देनियंत्रण कक्ष स्थापन११ जिल्ह्यांमध्ये ११ शीघ्र कृती दलविमानतळावर ‘एआययू’, रेल्वेत ‘आरपीएफ’शी समन्वय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैशांच्या वापरावर प्रतिबंध आणण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या अन्वेषण संचालनालयाच्या सुविधांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर विभागीय अन्वेषण विभाग सज्ज असून विदर्भात काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या सराफ चेंबर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती आयकर विभागाचे प्रधान संचालक (अन्वेषण) जय राज कालरा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
कालरा म्हणाले, लोकसभा निवडणुकांदरम्यान आयकर विभागाने कारवाई केली होती. अनुभव चांगला आहे. पण नागरिक अनेकदा खोटी माहिती देतात. त्याची शहानिशा करूनच कारवाई करण्यात आली. अशीच कारवाई विधानसभा निवडणुकांदरम्यान करण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्ष आणि शीघ्र कृती दलात ७५ अधिकारी
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत काळा पैसा आणि अन्य प्रकारची वस्तू पकडण्याची जबाबदारी आयकर विभागाकडे (अन्वेषण) दिली आहे. रकमेचे वाटप आणि कुणी रोख वाहनातून घेऊन जात असेल माहितीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रोख आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या देवाणघेवाणीवर राज्य आणि इतर केंद्रीय विभागाच्या समन्वयाने तसेच स्वत:च्या अधिकारात बारीक लक्ष ठेवून आहे. काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ११ शीघ्र कृती दल (क्यूक रिस्पॉन टीम अर्थात क्यूआरटी) स्थापन केले आहेत. प्रत्येक दलात आयकर विभागाचे सहायक आयुक्त, दोन वरिष्ठ अधिकारी, तीन निरीक्षक याप्रमाणे ११ दलात जवळपास ७५ अधिकारी कार्यरत आहेत. याशिवाय नागरिकांना माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्अ‍ॅप क्रमांक आणि फॅक्स क्रमांक प्रकाशित केले आहेत. नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीच्या आधारे क्यूआरटीतर्फे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासोबत वाहतूक पोलीस विभागाच्या इंटेलिजन्स चमूसोबत समन्वय साधून त्यांच्याद्वारे प्राप्त माहितीच्या आधारेही कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर आणि गोंदिया विमानतळावर एअर इंटेजिलन्स युनिट तैनात
बाहेरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या हवाई प्रवाशांवर ‘सीआयएसएफ’ सोबत समन्वय साधून आयकर विभागाचे एअर इंटेलिजन्स युनिट नागपूर आणि गोंदिया विमानतळावर २४ तास नजर ठेवणार आहे. सीआयएसएफचे अधिकारी प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवून संपूर्ण माहिती युनिटला देतील. त्याआधारे संबंधित प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.
रोकड नेणाऱ्यांनी वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत
वाहनातून जास्त रोकड नेताना संबंधितांने वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत. व्यापाऱ्यांनी बँकेत भरण्यासाठी रोकड नेताना किंवा विड्रॉल करून आणताना तसेच बँकांच्या एटीएममध्ये भरण्यासाठी रोकड नेताना संबंधितांनी वैध कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. माहितीच्या आधारे विभागाने कारवाई केल्यास कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांना सोडण्यात येणार आहे. निवडणुकादरम्यान सावनेरमध्ये ५० लाख रुपये रोख विभागाने ताब्यात घेतली होती, असे कालरा यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे क्यूआरटी कारवाईदरम्यान कागदपत्रांची तपासणी करणार आहे. जर कागदपत्रे सोबत नसल्यास पोलिसांना रक्कम जप्त करण्यास सांगण्यात येईल आणि या रकमेची कागदपत्रे संबंधितांनी एक-दोन दिवसांनी आणल्यास जप्त रक्कम परत करण्यात येणार आहे.
बँकेतून १० लाखांच्या विड्रॉलची माहिती विभागाला देणे बंधनकारक
बँकेत १० लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा किंवा विड्रॉलची माहिती बँकेला देण्यास सांगितले आहे. यामध्ये पतसंस्था, सहकारी बँक, राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचा समावेश आहे. पण ऑनलाईन व्यवहारावर विभाग काहीच करू शकत नाही, असे कालरा यांनी स्पष्ट केले. याची माहिती घेण्यासाठी नवी दिल्लीत फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (एफआययू) आहे. बँक एफआययूला माहिती देईल आणि त्यांच्या आदेशानुसार विभाग संबंधितांवर कारवाई करणार आहे.
काळ्या पैशांची माहिती व्हॉट्सअ‍ॅप, दूरध्वनी, टोल फ्री क्रमांकावर द्यावी
मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आणि काळ्या पैशांचा वापर टाळण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे येऊन काळा पैसा, रोख, सोने व चांदी, इतर मौल्यवान वस्तूंची साठवण आणि वाटप याची माहिती टोल फ्री क्रमांक, दूरध्वनी क्रमांक आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पुराव्यासह द्यावी, असे आवाहन कालरा यांनी केले आहे. नागपूर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्र. १८००२३३३७८५, व्हॉट्सअ‍ॅप क्र. ९४०३३९१६६४, फॅक्स क्र. ०७१२-२५२५८४४ यावर नागरिकांना संपर्क साधता येईल.

 

Web Title: Income tax watch on black money in elections: Jai Raj Kajla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.