Husband attack on wife by knife due to doubt in Nagpur | नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर गुप्तीने हल्ला
नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर गुप्तीने हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीवर गुप्तीने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. मोनाली सचिन तोटे असे जखमी महिलेचे तर सचिन तोटे असे आरोपीचे नाव आहे.
तोटे दाम्पत्य बोरगाव (मानकापूर) परिसरात राहते. मोनाली खासगी नोकरी करते. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर संशय घेत असल्यामुळे पती सचिनसोबत तिचा वाद सुरू आहे. नेहमीप्रमाणे ती आज अ‍ॅक्टीव्हाने घराबाहेर पडली. तिचा पाठलाग करीत सचिनही निघाला. त्याला वाटेत काय दिसले, कळायला मार्ग नाही. दुपारी १२. १५ च्या सुमारास सचिनने सीताबर्डीतील कॅनल रोडवर तिला रोखण्याचा प्रयत्न केला. ती सुसाट वेगाने जात असल्यामुळे दुचाकीला कट मारला आणि नंतर तिच्यावर गुप्तीने हल्ला चढवला. तिच्या पोट, पाठ आणि तोंडावर गुप्ती मारल्यामुळे ती जबर जखमी झाली. अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या ठिकाणी हा थरार घडत असल्याचे पाहून अनेकांनी तिकडे धाव घेतली. मोनालीला जवळच असलेल्या केअर हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही माहिती मिळताच सीताबर्डीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी मोनालीचे बयाण घेतल्यानंतर पती सचिनविरुद्ध प्राणघातक हल्लयाच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

Web Title: Husband attack on wife by knife due to doubt in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.