आरोग्य विभाग : नागपूर  ग्रामीण डॉक्टरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:41 PM2019-08-22T18:41:08+5:302019-08-22T18:41:58+5:30

ग्रामीण भागात जे आरोग्य अधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत,तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थांबवून ठेवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद, नागपूरअंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Health Department: Time of hunger on Nagpur rural doctors | आरोग्य विभाग : नागपूर  ग्रामीण डॉक्टरांवर उपासमारीची वेळ

आरोग्य विभाग : नागपूर  ग्रामीण डॉक्टरांवर उपासमारीची वेळ

googlenewsNext
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. यासाठी इस्पितळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर तयार नसल्याने आजही अनेक जागा रिक्त आहेत. जे आरोग्य अधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत, त्यांच्या घामाचा पैसाही वेळेवर देण्यास प्रशासन तत्परता दाखवीत नाही. उलट तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थांबवून ठेवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद, नागपूरअंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे कॉर्पाेरेट हॉस्पिटलची संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सक्षमपणे चालविणे हे नवीन आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागासमोर आहे. मात्र, आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारण्याच्या व रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा गावातच मिळाव्यात, यासाठी कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. म्हणूनच या रुग्णालयांप्रति रुग्णांचा विश्वास कमी होत चालला आहे. यातच आहे त्या सोयीत रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. मे ते जुलै तब्बल तीन महिन्यांचे त्यांना वेतनच देण्यात आले नाही. यामुळे डॉक्टर अडचणीत आले आहेत. ज्यांनी कर्ज घेतले त्यांचे हप्ते थांबले. त्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य विभाग डॉक्टरांचे वेतन काढण्यास एवढा उशीर लावत असेल तर इस्पितळे कशी चालविले जात असतील, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सूत्रानुसार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ‘अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफिसर’चे (एओ) पद रिक्त आहे. यामुळे कार्यरत लिपिकांना जेवढे कळते तेवढेच काम करतात. यातही त्यांच्यावर कामाचा ताण आहे. यामुळे वेळेवर वेतन निघत नाही. यासंदर्भात गुरुवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी वर्ग गट ‘अ’ संघटनेच्यावतीने (मॅग्मो) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना निवेदन दिले.
वेळेवर वेतनाची मागणी
गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन मिळाले नाही. यासाठी ‘मॅग्मो’ संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी याबाबत सकारात्मक चर्चा केली. लवकरच वेतन उपलब्ध होईल, अशी ग्वाही दिली आहे.
डॉ. विद्यानंद गायकवाड
अध्यक्ष, मॅग्मो, नागपूर

Web Title: Health Department: Time of hunger on Nagpur rural doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.