नागपूर विमानतळावरील ग्राऊंड हॅण्डलिंगची सेवा मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:55 AM2020-09-08T09:55:03+5:302020-09-08T09:56:44+5:30

कोरोना प्रकोपाच्या काळात एका एअरलाईन्सचे संचालन अनियमित झाले. नेमके याच काळात ग्राऊंड हॅण्डलिंगचे कंत्राटही संपले. परिणामत: ४२ कर्मचारी या काळात बेकार झाले आहेत.

Ground handling service at Nagpur Airport slowed down | नागपूर विमानतळावरील ग्राऊंड हॅण्डलिंगची सेवा मंदावली

नागपूर विमानतळावरील ग्राऊंड हॅण्डलिंगची सेवा मंदावली

googlenewsNext
ठळक मुद्देजेनस एव्हिएशनचे कंत्राट संपले ४२ कर्मचाऱ्यांवर बेकारीची पाळी

लोकमत एक्सक्लूसिव
वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाबद्दल मागील १० वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. त्यामागील अनेक कारणांपैकी अद्याप कुणी खासगी भागीदार निश्चित न होणे हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. या प्रदीर्घ काळात काही उड्डाणेच नाही तर काही एअरलाईन्सनी येथून संचालन बंद केले आहे. कोरोना प्रकोपाच्या काळात एका एअरलाईन्सचे संचालन अनियमित झाले. नेमके याच काळात ग्राऊंड हॅण्डलिंगचे कंत्राटही संपले. परिणामत: ४२ कर्मचारी या काळात बेकार झाले आहेत.

कोणत्याही एअरलाईन्स विमानातील प्रवाशांसाठी सीडी लावणे, बॅगेज टॅग करणे, वजनमाप, सफाई, ट्रक्टर व बससाठी चालक, तंत्रज्ज्ञ आदींच्या सेवा ग्राऊंड हॅण्डलिंग एजन्सी देत असते. एअरलाईन्स या कामासाठी कंत्राट देते. यापैकी गो एअरसाठी ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम सांभाळणाऱ्या जेनस एव्हिएशन प्रा.लि. या कंपनीचे कंत्राट ३१ मार्चला संपले. मागील ६ वर्षांपासून ही एजन्सी काम करीत होती.

२०१४ मध्ये या कंपनीकडे जवळपास १२० कर्मचारी होते. जानेवारी २०२० मध्ये त्यात घट होऊन ही संख्या ८० वर आली. दोन महिन्यांनंतर त्यातही घट होऊन ४२ वर थांबली. ही एजन्सी एअर एशियाच्या ग्राऊंड हॅण्डलिंगचेही काम सांभाळायची. मात्र एअर एशियाने काही वर्षांपूर्वी नागपुरातून संचालन पूर्णत: बंद केले. सध्या ओरिया, नॉस, सिल्वर जुबली, एजाइल आणि एआयटीएसएल ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम सांभाळत आहे. या पैकी एअर इंडियाची सब्सिडेरी कंपनी असलेली एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमि.कडे बोइंग ७४७ आणि मोठे कार्गो विमान आयएल ७६ साठी एमडीएल व आयडीएल सारख्या मशीन्स उपलब्ध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एअर इंडियाच्या जागी ही एजन्सी गो एअरच्या ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम सांभाळत आहे.

नॉस एजन्सी नागपूर विमानतळावर बऱ्याच पूर्वीपासून कार्यरत आहे. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यावर आतापर्यंत कतर आणि एअर अरेबियाची उड्डाणे सुरू न झाल्याने याचेही कामकाज ठप्प पडले आहे. या कंपनीमध्ये अद्यापतरी कर्मचारी कपात किंवा वेतन थांबविल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत.

 

Web Title: Ground handling service at Nagpur Airport slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.