Gangster Santosh Ambkar's property seizes worth Rs 5 crores | नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकरची सव्वापाच कोटींची मालमत्ता जप्त
नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकरची सव्वापाच कोटींची मालमत्ता जप्त

ठळक मुद्दे९० लाखांच्या बीएमडब्ल्यूसह चार कार, चार दुचाकी : रोख, दागिने आणि नोटा मोजण्याची मशीनही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, गँगस्टर संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या ताब्यात असलेली ९० लाखांची बीएमडब्ल्यू आणि अन्य तीन आलिशान कार तसेच रोख रकमेसह कोट्यवधींच्या चीजवस्तू गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री जप्त केल्या. 


घराघरात सर्वत्र लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असताना पोलिसांनी आंबेकरच्या आलिशान घराचा ताबा घेतला होता. त्याने अनेकांना फसवून, धमकावून, ब्लॅकमेल करून जमा केलेली सुमारे सव्वापाच कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली.
कुख्यात संतोषने अपहरण करून, धाक दाखवून, हत्या करवून अनेकांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता हडपल्या आहेत. खंडणी मागून आणि फसवणूक करूनही त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमविली आहे. आंबेकरचे गुन्हेगारी साम्राज्य नागपुरातच नव्हे तर बेंगळुरू आणि मुंबईतही आहे. तेथे त्याचे बेनामी हॉटेल, फ्लॅट आणि रिसोर्ट असल्याचे सांगितले जाते तर, त्याचे नागपूरला इतवारीत आलिशान निवासस्थान आहे. या निवासस्थानात त्याने लाखोंच्या महागड्या चीजवस्तू जमवून ठेवल्या आहेत. लाखोंची वाहने, हर्ले डेव्हिडसन् बाईकसह शानशौकीच्या चीजवस्तू वापरून आंबेकर आलिशान जीवन जगत होता. स्वत:ला राजकीय पाठबळ असल्याचे सांगून तो उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार आणि चक्क पोलिसांनाही त्यांचे काम करून देण्याची थापेबाजी करायचा. गुजरातमधील जिगर पटेल नामक व्यापाऱ्याला त्याने जमिनीची खोटी कागदपत्रे दाखवून ती विकायची आहे, असे सांगत पाच कोटींचा गंडा घातला. एवढेच नव्हे तर हे पाच कोटी रुपये हडपल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पुन्हा एक कोटींची खंडणी मागितली. अनेकांना गंडविले तसेच जिगर पटेल यांच्याबाबतीत करण्याचा त्याचा कट होता. मात्र, पटेल यांच्या ‘हॉट लाईन’मुळे आंबेकरचा डाव उधळला गेला. नव्हे हा गुन्हा त्याच्या अंगावर उलटला. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू असताना पटेल यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर त्याच्याविरुद्ध फसवणूक करणे, लैंगिक शोषण करणे, धमक्या देणे, असे एकापाठोपाठ चार गंभीर गुन्हे दाखल झाले.
अन् पोलिसांनी त्याच्यावर तसेच त्याच्या टोळीतील गुन्हेगारांवर मकोकाही लावला. आंबेकरला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुजरातमधीलच हेमंत पुरोहित, बाल्या गावंडे हत्याकांडात आंबेकरच्या चिथावणीवरून सहभागी झालेला जय काळे नामक साथीदार, गेल्या आठ वर्षांपासून आंबेकरकडून लैंगिक शोषण होत असलेली तरुणी यांनीही तक्रारी नोंदवल्या. त्याचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक बाबी कळाल्या. त्यानुसार, त्याने काहींची हत्या करवून, काहींचे अपहरण करून तर काहींना धमक्या देऊन खंडणी उकळली. अनेकांच्या मालमत्ता बळकावल्या. हे गुन्हे करीत असताना त्याने नंतर फसवणुकीचा फंडा अवलंबला. नागपूर, मुंबई, गुजरातसह ठिकठिकाणी त्याने दलाल पेरले. त्यांच्या माध्यमातून तो मोठमोठे उद्योजक व्यावसायिक यांना मोक्याच्या जागेची बनावट कागदपत्रे दाखवून तो फसवू लागला. ज्याला गंडवायचे आहे, त्यांना तो आपल्या नागपुरातील आलिशान निवासस्थानी बोलवायचा. येथे त्याच्या पोर्चमध्ये इंग्रजी सिनेमात दिसणाऱ्या कारसारखी टू सीटर बीएमडब्ल्यू फॉर्च्युनर आणि अन्य काही कार, हार्ले डेव्हिडसन व अन्य महागड्या दुचाकी, दोन मोठमोठे श्वान दाखवायचा. स्वत:च्या आजूबाजूला बाऊन्सर ठेवून नामवंत व्यक्तींसोबत फोनवरून बोलत असल्याचा बनाव करून तो सावज जाळ्यात ओढत असे. ५०० च्या नोटा द्या आणि २ हजारांच्या नोटा घ्या. एका कोटीवर एक लाख रुपये जास्त मिळवा, अशीही ऑफर त्याने सुरू केली होती. त्यातून त्याने आपले कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले. ही सर्व मालमत्ता गुन्हेगारीतूनच त्याने जमा केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आम्ही ती कायदेशीररीत्या जप्त करण्याची प्रक्रिया राबविल्याचे अतिरिक्त आयुक्त भरणे म्हणाले. पोलिसांनी आतापर्यंत संतोष आंबेकर तसेच त्याचा भाचा नीलेश केदार, चंदन ओमप्रकाश चौधरी, जुही चंदन चौधरी (मुंबई), हवाला व्यावसायिक अंकितकुमार महेंद्रभाई पटेल (रा. अंकलेश्वर, भरुच, गुजरात), अरविंदभाई द्वारकाभाई पटेल (रा. बिमराट, सूरत, गुजरात) आणि अजय लक्ष्मणभाई पटेल (रा. कांसा, म्हैसाणा, गुजरात) तसेच राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (वय ३९, रा. धरमपेठ, नागपूर) या सर्वांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५ कोटी ३० लाख ८९ हजार ८४० रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे उपायुक्त राजमाने यांनी सांगितले.
आंबेकरविरुद्ध अनेक जण तक्रारी करण्यासाठी पुढे आले असून, त्या तक्रारींचीही आम्ही शहानिशा करीत असल्याचे राजमाने म्हणाले.
कोट्यवधी रुपये हडपणा-या आंबेकरने आणखी कुठे कुठे आणि किती मालमत्ता जमवून ठेवली, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता कुठे गर्लफ्रेण्ड तर कुठे नोकराच्या नावे त्याने मालमत्ता जमविल्याचा संशय आहे, मात्र चौकशीनंतरच ते उघड केले जाईल, असे ते म्हणाले. तपासात अडसर येऊ शकतो, असे सांगून अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे भरणे आणि राजमाने यांनी टाळले.

नागपूरचा हवालाही कचाट्यात !
संतोष आंबेकरच्या गुन्हेगारीत अनेकांचा सहभाग आहे. तो आणि त्याचे दलाल फसवणूक झालेल्यांना त्यात नागपुरातील काही दलाल आणि हवाला व्यावसायिकही आहेत. त्यातीलच एक हवाला व्यावसायिक पोलिसांनी आज ताब्यात घेतला. त्याची चौकशी सुरू आहे. आंबेकर टोळीच्या धमक्यांना, फसवणूकीला बळी पडलेल्यांनी थेट गुन्हे शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, नरेंद्र हिवरे उपस्थित होते.

कंबरडे मोडण्याचा प्रयत्न !
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संघटीत गुन्हेगारांचे नेटवर्क मोडून काढण्याचा धडाका पोलिसांनी लावला आहे. कुख्यात गुन्हेगारांच्या १२ टोळ्यांविरुद्ध मकोका आणि ४१ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए लावण्यात आला आहे. वर्षभरात एवढ्या मोठ्या कारवायाचा पहिल्यांदाच झाल्या आहेत. कुण्या गुन्हेगाराची अशा पद्धतीने जमविलेली मालमत्ता जप्त करण्याची ही केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिली कारवाई आहे. गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडल्यास तो सुतासारखा सरळ होईल, अशी पोलीस आयुक्तांची कल्पना आहे. आंबेकरची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई हा त्याचाच एक भाग असल्याचे अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी सांगितले.

Web Title: Gangster Santosh Ambkar's property seizes worth Rs 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.