गुंडांच्या टोळीचा नागपुरातील गोवा कॉलनीत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 11:41 PM2021-07-22T23:41:40+5:302021-07-22T23:42:11+5:30

Gangstars opened fire दोन तासापूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी गुंडांच्या एका टोळक्याने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करणाऱ्या तरुणांवर लागोपाठ चार गोळ्या झाडल्या.

Gangstars opened fire in Goa Colony in Nagpur | गुंडांच्या टोळीचा नागपुरातील गोवा कॉलनीत गोळीबार

गुंडांच्या टोळीचा नागपुरातील गोवा कॉलनीत गोळीबार

googlenewsNext
ठळक मुद्देदोन मोटरसायकलवर सहा गुंड , तरुणांवर चार गोळ्या झाडल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दोन तासापूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी गुंडांच्या एका टोळक्याने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करणाऱ्या तरुणांवर लागोपाठ चार गोळ्या झाडल्या. सुदैवाने आरोपींचा नेम चुकल्याने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास गोवा कॉलनीत ही थरारक घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

हातठेला, चाट सेंटर लावणारे काही तरुण गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास गोवा कॉलनीतील एका बाकड्यावर बसून गप्पा करीत होते. तेवढ्यात तेथे दोन दारुडे आले. एक जण नाहक बडबड करीत असल्याने बाकड्यावरील सूरज नामक तरुणाने त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्याने वाद घालून शिवीगाळ केल्याने बाकड्यावरील एका तरुणाने त्याला दोन झापडा मारल्या.

माँ का दूध पिया है तो...

झापड खाल्ल्यानंतर नशेत टून्न असलेला आरोपी मारहाण करणाऱ्या तरुणाला आव्हान देऊ लागला. माँ का दूध पिया है तो...ईधरईच रूक... मै अभी आता हूं...म्हणत तो पळतच गेला. नशेत असल्यामुळे मारहाण करणाऱ्या तरुणाने आणि इतरांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. रात्री ९ च्या सुमारास दोन मोटरसायकलवर ६ आरोपी तेथे आले. एकाच्या हातात पिस्तुल आणि दुसऱ्याच्या हातात चाकू होता. तर अन्य चाैघे वेगवेगळे शस्त्र घेऊन होते. त्यांनी गोवा कॉलनीतील नागरिकांना ‘कहां है वो...’ म्हणत सिनेस्टाईल शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणांच्या दिशेने एका पाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. आरोपींचा नेम चुकल्याने सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. तशात हिंमत करून परिसरातील मंडळी मोठ्या संख्येत गोळा झाली. ते आपल्याकडे येत असल्याचे बघून गुंड पळून गेले

मोठा पोलीस ताफा धडकला

घटनेची माहिती कळताच सदरचे ठाणेदार संतोष बाकल आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पाठोपाठ अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि गुन्हे शाखेचाही ताफा पोहचला. सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबार करणारे गुंड मरियमनगरात असल्याचे समजते. वेगवेगळी पोलीस पथके त्यांचा शोध घेत होती. रात्री ११ पर्यंत या प्रकरणात कोणत्याही आरोपीचे नाव स्पष्ट झाले नव्हते. खबरदारीचा उपाय म्हणून गोवा कॉलनीत मोठा पोलीस ताफा नियुक्त करण्यात आला होता.

Web Title: Gangstars opened fire in Goa Colony in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.