यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 06:17 IST2025-12-02T06:14:50+5:302025-12-02T06:17:53+5:30
यंग सायंटिस्ट अवॉर्ड विजेता आणि ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवालला नागपूर खंडपीठाने तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी सुधारित शिक्षा सुनावली.

यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
नागपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात टाकणारा यंग सायंटिस्ट अवॉर्ड विजेता आणि ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.
नागपूर सत्र न्यायालयाने ३ जून २०२४ रोजी अग्रवालला माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्यातील कलम ३ (१) (सी) अंतर्गत १४ वर्षे सश्रम कारावास तर, कलम ५(१) (ए) (बी) (सी) (डी) आणि कलम ५(३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध अग्रवालने अपील दाखल केले होते.
उत्तराखंड येथील मूळ रहिवासी
निशांत नेहरूनगर, जि. हरिद्वार येथील मूळ रहिवासी असून, तो ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीच्या नागपुरमधील प्रकल्पामध्ये इंजिनिअर होता. तो उज्ज्वलनगरात भाड्याने राहत होता.
ब्रह्मोसच्या फाइल्स पाकिस्तानला मिळाल्या
एटीएस पथकाने निशांत अग्रवालचा वैयक्तिक लॅपटॉप, मोबाइल फोन, हार्डडिस्क इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले होते.
त्यात ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल व ब्रह्मोस कंपनीसंदर्भातील महत्त्वपूर्ण फाइल्स आढळल्या. त्या फाइल्स पाकिस्तानपर्यंत पोहोचल्या होत्या. त्या बदल्यात त्याला ३८ हजार यूएस डॉलर महिन्याचे आमिष मिळाले होते.
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही
देशातील यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाल्यानंतर निशांतची कीर्ती पसरली. त्याने त्याची चमकोगिरीची वाढत गेली. फेसबुकवर वेगवेगळ्या एअरपोर्टवरचे फोटो तो अपलोड करीत होता. या फोटो-व्हिडिओनेच आधी मिसेस काळे आणि नंतर सेजल कपूर व नेहा शर्माने निशांतवर जाळे फेकले. त्यात तो अडकला. त्याला ८ ऑक्टोबर २०१८ ला अटक केली.
पाकिस्तानचे गुप्तहेर नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने फेसबुक तर, सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाउंट चालवत होते. निशांतसह भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचारी या गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची माहिती लखनौ एटीएसला मिळाली.
कोणत्या कायद्याने शिक्षा?
हायकोर्टाने रेकॉर्डवरील बाबी लक्षात घेता निशांतचे अपील अंशतः मंजूर केले आणि सत्र न्यायालयातील शिक्षा रद्द केली आणि शासकीय गुपिते कायद्यातील कलम y(9)(57) अंतर्गत दोषी ठरवून त्याला ही सुधारित शिक्षा सुनावली.