नागपूरमधील वेल ट्रिट हॉस्पीटलमध्ये आगीचा भडका, पळापळ अन् किंकाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:30+5:302021-04-10T11:28:23+5:30

प्रवीण खापरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या चक्रव्यूहात अगोदरच अडकल्यामुळे उपचारातून दिलासा मिळेल आणि परत कुटुंबियांमध्ये परत जाऊ ...

nagpur well treat hospital fire | नागपूरमधील वेल ट्रिट हॉस्पीटलमध्ये आगीचा भडका, पळापळ अन् किंकाळ्या

नागपूरमधील वेल ट्रिट हॉस्पीटलमध्ये आगीचा भडका, पळापळ अन् किंकाळ्या

googlenewsNext

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या चक्रव्यूहात अगोदरच अडकल्यामुळे उपचारातून दिलासा मिळेल आणि परत कुटुंबियांमध्ये परत जाऊ हीच त्यांच्या मनी आशा होती. दिवसभराचा उपचार झाला अन् आता निद्राधीन होणार तोच नियतीने आगीच्या रुपात प्रहार केला. तोंडाला ऑक्सीजन, हाताला सलाईन अन् अंगात उठण्याचेही त्राण नाही. काय करावे, कुठे जावे हा विचार करायलादेखील वेळ मिळाला नाही. धुराने कोंडणारा श्वास अन् आगीची दाहकता यामुळे रुग्णांच्या किंकाळ्यांनी परिसर अक्षरश: शहारला. आपल्या जीवलगांच्या काळजीने बाहेर थांबलेल्या नातेवाईकांचा आक्रोश ह्रद्य पिळवटून टाकणारा होता. वेल ट्रिट हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीने प्रत्येकाच्याच अंगावर शहारे आणले.

कोरोना महामारीच्या काळात काही खाजगी हॉस्पिटल्सला कोरोना उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. त्यात वेल ट्रिट हॉस्पिटलचाही समावेश होतो. ३० बेड क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे जवळपास ५० रुग्ण उपचारासाठी भरती असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे, क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहेत. विशेष म्हणजे, जेथे हे हॉस्पिटल आहे तो भाग जड वाहनांच्या वाहतुकीसाठी सर्वपरिचित आहे. रात्रीच्या वेळी ही वाहतूक अधिक असते. त्यामुळेच, हॉस्पिटलला आग लागली तेव्हा प्रचंड धावपळ उडाली होती. हॉस्पिटलला आग लागल्याची वार्ता कानी पडताच आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या व पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आणि स्थितीवर स्वत:चे नियंत्रण मिळवले. मात्र, बहुमजली हॉस्पिटल असल्याने स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास प्रचंड अडचण निर्माण झाली होती. आगीची माहिती मिळताच अनेकांचे नातेवाईक घटनास्थळी हजर झाले. मात्र, कोण कुठे आहे, याचा गोंधळ उडाल्याने नातेवाइकांची स्थिती भयप्रद होती. पळापळ, रुग्णांच्या किंचाळ्यांनी परिसर दणाणून निघाला होता.

नागरिकांनी बजावली कर्तव्यदक्षता

हॉस्पिटलमध्ये सर्वच्या सर्व रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे माहीत असतानाही नागरिकांनी कशाचीही तमा बाळगली नाही. सर्वप्रथम जमेल तसे रुग्णांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. नागरिकांनी दाखवलेली ही कर्तव्यदक्षता कौतुकास्पद ठरली. नागरिकांच्या दक्षतेमुळेच अनेक रुग्णांचा जीव तत्क्षणी वाचविण्यात यश आले. अन्यथा स्थितीचे वर्णन करणे कठीण झाले असते.

सावंगी मेघेत उडाला गोंधळ

मेयो, मेडिकल, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण वळवण्यात आले असताना सावंगी मेघे येथे रुग्णांजवळ कोविड सर्टिफिकेट नसल्याने घेतले जात नसल्याचे सांगितले जात होते. शिवाय, बेड्स उपलब्ध नसल्याचेही कारण सांगितले जात होते. या सर्व रुग्णांना नंतर मेडिकल व मेयोमध्ये रेफर करण्यात आले.

एसीला आग लागल्यामुळे हॉस्पिटलला आग लागल्याचे प्रथमदर्शनी कळत आहे. मात्र, सर्व रुग्णांना तात्काळ प्रभावाने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले आहे. स्थिती नियंत्रणात आहे.

- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

मी माझ्या चेंबरमध्ये बसलो असताना एसीला आग लागल्याचे नर्सने सांगितले. धावपळ करत असतानाच आगीचा भडका उडाला आणि काही समजायच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी आमच्या मदतीला स्थानिक नागरिक आले आणि रुग्णांना बाहेर काढण्यास मदत करू लागले. हॉस्पिटलमध्ये घटनेच्या वेळी २५ रुग्ण होते. त्यापैकी १० रुग्ण अतिदक्षता विभागात होते.

- डॉ. राहुल ठवरे, संचालक, वेल ट्रिट हॉस्पिटल

Web Title: nagpur well treat hospital fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.